हलवा सोहळा (संग्रहित संपादित प्रतिमा)

1 फेब्रुवारी रोजी सादर होणार्‍या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2020 (Budget 2020) च्या कागदपत्रांच्या छपाईची आजपासून सुरुवात झाली. सोमवारी पारंपरिक हलवा सोहळा (Halwa Ceremony) पार पडला, त्यानंतर छपाईच्या कामाला सुरुवात झाली. उत्तर ब्लॉकमध्ये आयोजित 'हलवा सोहळ्या' दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman), देखील वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

हा सोहळा 2020-21 च्या बजेटशी निगडीत कागदपत्रांच्या छपाईच्या प्रारंभाशी संबंधित आहे. यंदा सीतारमण त्यांचे दुसरे बजेट सादर करतील. यापूर्वी त्यांनी जुलै 2019 मध्ये निवडणूकानंतरचे बजेट सादर केले होते.

अर्थ मंत्रालयाचे सर्व सचिव, सीबीडीटी, सीबीआयसीचे प्रमुख आणि अर्थसंकल्पात सामील झालेले अन्य प्रमुख अधिकारी आणि इतर कर्मचारीही या हलवा सोहळ्यात सामील झाले होते. अर्थ मंत्रालयाची ही वार्षिक परंपरा अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही दिवस आधी संपन्न होते. मोठ्या लोखंडी भांड्यात तयार केलेल्या 'हलवा' मंत्रालयाचे सर्व कर्मचारी, अर्थमंत्री एकत्र येऊन खातात. एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात गोड खाऊन केली जाते, त्यानुसार अर्थसंकल्पाचे काम सुरु होण्याआधी 'हलवा' खाण्याची परंपरा आहे. (हेही वाचा: Budget 2020: आगामी अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना मिळू शकते मोठी खूषखबर; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची शक्यता)

हलवा समारंभानंतर आजपासून अर्थ मंत्रालयाचा अर्थसंकल्प बनविण्याशी संबंधित सर्व अधिकारी, अर्थ मंत्रालयात अर्थसंकल्प सादर होईपर्यंत राहतील. रात्रंदिवस सुमारे 100 लोक बजेट पेपरच्या छपाईत व्यस्त राहणार आहेत. अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतरच ते बाहेर येतील. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, रेल्वे, शेती, सिंचन, गतिशीलता, आरोग्य, पाणी या क्षेत्रात गुंतवणूकीची तरतूद होणे अपेक्षित आहे. गेल्या तिमाहीत जीडीपी वाढ 4.5 टक्के होती. अशा परिस्थितीत मागणी वाढविणे आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. हे कसे केले जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.