खर्चाची बचत करण्यासाठी BSNL ने सादर केली VRS योजना; 80 हजार कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती?
BSNL (Photo Credit: Livemint)

सरकार-टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला सरकारकडून मदत पॅकेज मिळाल्यानंतर, काही दिवसांनी कंपनीने कर्मचार्‍यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना (VRS) सुरू केली आहे. या योजनेत तब्बल 70 ते 80 हजार कर्मचारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतील, त्यामुळे कंपनी पगारामार्फत जवळजवळ 7 हजार कोटी रुपयांची बचत होईल, अशी कंपनीला आशा आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व कर्मचारी या योजनेंतर्गत ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊ शकतात. सध्या बीएसएनएल फार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे पैशांची बचत करण्यासाठी कंपनीने ही नामी युक्ती योजली आहे.

बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवर म्हणाले की, ‘ही योजना 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत लागू होईल. सर्व फील्ड युनिट्सच्या कर्मचार्‍यांना या योजनेची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बीएसएनएलच्या एकूण 1.50 लाख कर्मचार्‍यांपैकी सुमारे एक लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत. आतापर्यंत सरकारने दिलेली सर्वोत्कृष्ट व्हीआरएस योजना आहे, त्यामुळे बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.’ (हेही वाचा: खुशखबर! Reliance Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लढविली नवी शक्कल; 5 मिनिट फोनवर बोलल्यास ग्राहकांना मिळणार 6 पैसे कॅशबॅक)

या योजनेस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एक्स-ग्रेशियामध्ये, सेवेत पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी 35 दिवसांचा पगार आणि सेवानिवृत्तीच्या उर्वरित वर्षासाठी 25 दिवसांचा पगार जोडला जाईल. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (MTNL) सुद्धा आपल्या कर्मचार्‍यांसाठी व्हीआरएस योजना आणली आहे. ही योजना व्हीआरएसच्या गुजरात मॉडेलवर आधारित आहे. ही योजना 3 डिसेंबरपर्यंतही खुली असेल.

दरम्यान, गेल्या महिन्यात सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी 69, 000 कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज जाहीर केले. यात दिवाळखोरीत असणाऱ्या या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करणे, त्यांची मालमत्ता बाजारात आणणे आणि कर्मचार्‍यांना व्हीआरएस देणे यांचा समावेश आहे.