संपूर्ण भारतात सध्या तेजीत असलेल्या Reliance Jio या खासगी टेलिकॉम कंपनीला टक्कर देण्यासाठी अन्य खासगी कंपन्या पुढे सरसावल्या असून यात आता BSNL या सरकारी कंपनीने उडी घेतली आहे. अलीकडेच जिओ ने आपली मोफत कॉलिंग सेवा बंद केल्याचे घोषित केले. त्यानंतर जिओ वरून अन्य नेटवर्क कॉल करत असताना प्रतिमिनिट 6 पैसे आकारणे सुरु केले आहे. यामुळे जिओ च्या अनेक ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हीच संधी साधून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी BSNL ने एक नवी शक्कल लढविली आहे. यात BSNL च्या ग्राहकांनी इतर नेटवर्क वर कॉल केल्यास 5 मिनिटांवर 6 पैशाचे कॅशबॅक मिळणार आहे.
ही सेवा BSNL च्या वायरलाईन, FTTH आणि ब्रॉडबँड ग्राहकांना होणार आहे. या सेवेमुळे BSNL चे ग्राहक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीयांच्या पसंतीस उतरलेली कंपनी म्हणजे जिओ. जिओ ने आकर्षक ऑफर्स, उत्तम नेटवर्क यांसारख्या अनेक सेवांमुळे लोकप्रिय झाली. आणि अन्य टेलिकॉम कंपन्यांचे ग्राहक जिओ कडे वळाले.
हेदेखील वाचा- Reliance Jio ग्राहकांना इतर टेलिकॉम नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता भरावे लागणार 6 पैसे/ मिनिट; वाचा संपूर्ण माहिती
मात्र काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने एक मोठा धक्का देऊन ग्राहकांना आश्चर्यचकित केले. ज्यात अचानक जिओ ने आपली मोफत कॉलिंग सेवा बंद करुन जिओ वरून अन्य नेटवर्क वर कॉल केल्यास प्रतिमिनट 6 पैसे आकारले जाणार असल्याचे जाहीर केले. हा जिओ च्या ग्राहकांसाठी दुख:द धक्का तर अन्य टेलिकॉम कंपन्यांसाठी सुखद धक्का होता.
या संधीचा फायदा घेत BSNL लढवलेली ही शक्कल कामी येईल की नाही की जिओचे ग्राहक जिओ सोबतच राहतील हे येत्या काही दिवसांतच कळेल.