कर्नाटकातील बेल्लारी (Bellary) येथील कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) प्रशासकीय कार्यालयाबाहेर काळ्या जादूचा (Black Magic) प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सापडलेल्या विचित्र वस्तूंनी कर्मचारी हैराण झाले. यामध्ये काळ्या बाहुल्या, टोचलेल्या सुयांनी भरलेला भला मोठा भोपळा, नारळ, लिंबू आणि कुंकवाचा समावेश होता. या वस्तू अत्यंत व्यवस्थितपणे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मांडलेल्या होत्या.
घटनेचा तपशील-
अहवालानुसार, या ठिकाणी काही विधी करण्यात आले होते. यामध्ये छोट्या कलशावर दोरा गुंडाळला होता, गुंडाळणे, नारळाला ताईत बांधले होते. या ठिकाणी काही चिन्हे कोरण्यात अली होती. प्रत्येक वस्तूवर लाल कुंकवाचा लेप होता, तर भोपळा आणि लिंबांमध्ये सुया खुपसल्या होत्या. विशेष म्हणजे, कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असतानाही कोणतीही संशयास्पद हालचाल कॅमेऱ्यात कैद झाली नाही, तसेच कोणत्याही रक्षकाने असा प्रकार पाहिलेला नाही.
संशयाची दिशा-
केएमएफ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. या कारणामुळे 50 कर्मचाऱ्यांना संभाव्य कपातीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. केएमएफचे संचालक प्रभु शंकर यांनी या प्रकाराबाबत नाराज कर्मचाऱ्यांचा प्रतिशोध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बेल्लारी हे केएमएफच्या चार जिल्ह्यांचे केंद्र आहे व आता तिथे अशी घटना उघडकीस आल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. (हेही वाचा: Black Magic: कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी केली काळी जादू; दिला 21 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरे यांचा बळी, DK Shivakumar यांचा दावा)
राजकीय षड्यंत्राची शक्यता-
या घटनेमागे राजकीय हेतू असल्याचेही काहींचे मत आहे. काही जणांनी असा दावा केला आहे की, राजकीय फायदा मिळवण्यासाठी असे अघोरी प्रकार केले गेले असतील. मात्र, याबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप हाती लागलेले नाहीत.
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण-
या विचित्र घटनेने केएमएफमधील कर्मचारी धास्तावले असून परिसरात चर्चांना उधाण आले आहे. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांमुळे सामाजिक आणि मानसिक वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.