Black Magic To Destabilise Congress Karnataka Government: कर्नाटक (Karnataka) राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी तंत्रमंत्र, काळी जादू आणि यज्ञ (Black Magic) यांचा वापर केला जात असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही काळी जादू करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर काळी जादू करण्यासाठी केरळमधून तांत्रिक बोलावण्यात आले होते. बेंगळुरूच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले की, केरळमधून तांत्रिकांना बोलावून आमच्याविरुद्ध ‘शत्रु भैरवी यज्ञ’ केला गेला. आमचे सरकार पाडण्यासाठी पशुबळीही दिले गेले आहेत.
डीसीएम शिवकुमार यांनी मीडियाला सांगितले की, ‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अस्थिर करण्यासाठी केरळमधील एका मंदिराजवळील निर्जन ठिकाणी काळी जादू करण्यात आल्याचीही माझ्याकडे ठोस माहिती आहे. त्यासाठी 'राज कंटक' आणि 'मरण मोहन स्तंभ' यज्ञ करण्यात आला. केरळमध्ये काळ्या जादूच्या क्रियाकलापांबद्दल माहिती असलेल्या लोकांनी आम्हाला यज्ञ करणाऱ्यांबद्दल माहिती दिली. यासह बेंगळुरूमध्ये शत्रु भैरवी यज्ञ करण्यात आला असून त्यात त्यांना आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
शिवकुमार यांनी आरोप केला आहे की, अनेक अघोरी लोक या तंत्र-मंत्रामध्ये सामील आहेत. हे यज्ञ अघोरींनी केले आहेत आणि पंचबळी विधीही केल्याचे आम्हाला समजले आहे. यामध्ये 21 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरे यांचा बळी देण्यात आला. ते पुढे म्हणाले की, विरोधकांना वाटेल ते करू द्या. ज्या शक्तींवर आपला विश्वास आहे ते आपले संरक्षण करतील. मात्र आपले सरकार अस्थिर करण्यासाठी हा यज्ञ आणि तंत्र-मंत्र कोण करत आहे, हे शिवकुमार यांनी स्पष्ट केले नाही. हे संपूर्ण काम एका नेत्याच्या सांगण्यावरून होत असल्याचे ते म्हणाले.
डीसीएम शिवकुमार म्हणाले की, ते घरातून बाहेर पडण्यापूर्वी हात जोडून पूजा करतात. ते या प्रकारच्या काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाहीत व फक्त देवावर विश्वास ठेवतात. ते म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीचा उपासना आणि अध्यात्माचा अर्थ लावण्याबाबत स्वतःचा वेगळा दृष्टिकोन असतो. असे हानी पोहोचवण्याचे अनेक प्रयत्न आणि प्रयोग करूनही आपला विश्वास असलेली शक्ती आपले नक्कीच रक्षण करेल.’