BJP Ruling States: पीएम नरेंद्र मोदींच्या राजवटीतील देशाचा राजकीय नकाशा; जाणून घ्या गेल्या आठ वर्षांत राज्यांमधील 'भाजप' सत्तेचे चित्र कसे बदलले
नरेंंद्र मोदी (फोटो सौजन्य-PTI)

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे विधानसभा निवडणूक (Assembly Election Results 2022) निकाल बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहेत. सध्या या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपची (BJP) सत्ता येईल हे जवळजवळ निश्चित झाले आहे. फक्त पंजाबमध्ये ‘आप’ने चांगलीच मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आता आपचे सरकार येणार आहे. देशाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या 18 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या युतीची सरकारे आहेत. देशातील सुमारे 50% लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. म्हणजेच देशाच्या जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत.

सहा राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीची सरकारे आहेत. जिथे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 28 टक्के लोक राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सत्तेवर आल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये चांगलाच फायदा झाला. जाणून घेऊया कोणकोणत्या राज्यात भाजपचे सरकार होते, तसेच देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भाग भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या अधिपत्याखाली कधी आला आणि आणि नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस किती आकसली.

नरेंद्र मोदी मे 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. मोदी सत्तेत आले तेव्हा देशातील सात राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांची सरकारे होती. त्यापैकी पाच राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते. त्याचवेळी बिहार आणि पंजाबमध्ये त्यांचा मित्र पक्ष सरकार चालवत होते. देशातील 11 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या दोन राज्यांमध्ये राहते. उर्वरित छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते. देशातील 19 टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. म्हणजेच मोदी सत्तेवर आले तेव्हा जवळपास 30 टक्के लोकसंख्येवर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सरकारे चालत होती.

नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हा देशातील 14 राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते. देशाच्या 27 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या काँग्रेसशासित राज्यांमध्ये राहते. या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन मोठ्या राज्यांचा समावेश होता.

त्यानंतर चार वर्षांनंतर, मार्च 2018 मध्ये, 21 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते. देशातील सुमारे 71 टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. त्याचवेळी चार राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या राज्यांमध्ये सात टक्के लोकसंख्या राहते.

सध्या 18 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील 4 राज्यांमध्ये मतदान झाले. त्यांचा निर्णय काही तासांत समोर येईल. पण ट्रेंडनुसार या चारही राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन ते राज्य आता आपकडे गेले आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर सध्या 50 टक्के लोकसंख्येवर भाजपची सत्ता आहे.

या राज्यांमध्ये आज भाजपचे सरकार – गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, बिहार, नागालैंड, मेघालय, पुदुचेरी, सिक्कीम, मिझोरम. (हेही वाचा: Punjab Elections Results 2022: पंजाबमध्ये AAP ने मारली बाजी, काँग्रेसचा पत्ता कट; हे मुद्दे ठरले निर्णायक)

निकाल राहिला तर, भाजपला 18 राज्यांत आपली सत्ता कायम राखता येईल, पण आणखी एक राज्य काँग्रेसच्या हातून जाईल. सध्या सहा राज्यात काँग्रेस आणि आघाडीची सरकारे आहेत. यापैकी फक्त दोनच राज्ये अशी आहेत जिथे काँग्रेसने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. म्हणजे इथे त्यांचा मुख्यमंत्री आहे. तर इतर तीन राज्यांमध्ये युतीची सरकारे आहेत.