टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (Reliance Communications) अध्यक्ष अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासह चार जणांनी, कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या तिमाही अहवालानुसार कंपनीला 30 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. व्होडाफोन-आयडिया नंतर कॉर्पोरेट इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे नुकसान आहे. अनिल अंबानी यांच्याशिवाय छाया विराणी, रायना कारानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर यांनीही राजीनामा दिल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यातील अनिल अंबानी, छाया विरानी आणि मंजरी काकेर यांनी 15 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता. तर रायना कारानी यांनी 14 नोव्हेंबरला तर सुरेश रंगाचार यांनी 13 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता.
सध्या खासगी क्षेत्राला प्रचंड मंदीचा सामना करावा लागत आहे. बर्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील आर्थिक मंदीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम )देखील आर्थिक मंदीचा सामना करत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सुमारे 30,142 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने थकबाकीबाबत घेतलेल्या निर्णयामुळेच कंपन्यांचे नुकसान वाढले आहे. (हेही वाचा: Vodafone Idea ची दिवाळखोरीकडे वाटचाल; व्होडाफोन सीईओ Nick Read यांनी मागितली पीएम नरेंद्र मोदींची माफी)
मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 1,141 कोटी रुपयांचा नफा झाला होता. दूरसंचार कंपन्यांच्या वार्षिक एजीआरची गणना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीने 28,314 कोटींची तरतूद केली आहे. आरकॉमच्या एकूण उत्तरदायित्वांमध्ये 23,327 कोटी रुपये परवाना शुल्क आणि 4,987 कोटी रुपये स्पेक्ट्रम वापर शुल्क समाविष्ट आहे. आरकॉम आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांनी 1,210 कोटी व्याज आणि 458 कोटी रुपयांच्या परकीय चलन चढ-उतारांची तरतूद केलेली नाही. ही तरतूद केली गेली असती तर तोटा 1,668 कोटींनी वाढला असता.