Bhawana Kanth (Photo Credit: ANI)

फ्लाइट लेफ्टिनंट भावना कंठ (Bhawana Kanth)यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने परेड मध्ये सहभागी होत आहे. 26 जानेवारीच्या वायुसेनेच्या प्रदर्शनामध्ये सहभागी होणारी ती पहिली महिला फायटर पायलट ठरणार आहे. यंदा वायूसेना हलक्या लढाऊ विमानांसह, हेलिकॉप्टर सह आणि सुखोई 30 लढाऊ विमानांसोबत मॉक अप प्रदर्शन करणार आहे. सध्या भावना कंठ राजस्थान मधील एका एअरबेस मध्ये तैनात आहे. या ठिकाणी ती मिग 21 बाईसन लढाऊ विमान उडवते.

दरम्यान भावना कंठ ही पहिली महिला लढाऊ पायलट्स पैकी एक आहे. अवनी चतुर्वेदी आणि मोहनासिंह यांच्यासोबत तिने 2016 साली भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक म्हणून प्रवेश केला होता. भावना बिहारच्या दरभंगाची कन्या आहे. तिचा जन्म बेगुसराय मध्ये झाला. तिचे वडील IOCL मध्ये इंजिनियर होते. दरम्यान भावना देखील मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधील इंजिनिअर आहे.

यंदा 26 जानेवारीच्या परेड मध्ये राफेल लढाऊ विमान देखील सहभागी होत आहे. यंदा फ्लाई पास्टचा शेवट विमानाच्या ‘वर्टिकल चार्ली फार्मेशन’मध्ये उड्डाणासह होणार आहे. ‘वर्टिकल चार्ली फार्मेशन’मध्ये विमान कमी उंचीवर आकाशात झेपावतं. सरळ वर जातं आणि कलाबाजी दाखवत एका विशिष्ट उंचीवर स्थिरावतं. यंदा 26 जानेवारीला फ्लाईपास्ट मध्ये वायुसेनेची एकूण 38 विमानं आणि भारतीय लष्कर सेनेची 4 विमानं सहभागी होतील. दोन टप्प्यांत हा कार्यक्रम होणार असल्याने पहिला भाग 10.04 ते 10.20 या सकाळच्या वेळेत तर दुसरा 11.20 ते 11.45 या दुपारच्या वेळेत पहायला मिळणार आहे.

यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यावरदेखील कोरोनाचं सावट आहे. अटारी बॉर्डर वर जॉईंट परेड रद्द झाली  आहे. तसेच परदेशी पाहुण्यांशिवायच यंदाचा रिपब्लिक डे 2021 सोहळा पार पडणार आहे. यंदा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून  येणार होते. परंतू युके मधील कोरोनाची बिकट स्थिती पाहता त्यांचा दौरा रद्द झाला आहे.