Bharat Bandh (Photo Credits: PTI)

देशातील परिवहन व कामगार संघटनांनी आज 26 फेब्रुवारी रोजी भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली, इंधन दरवाढ, ई-बिल या पार्श्वभूमीवर आज देशभरातील सर्व व्यापारी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटना कॅटने (CAIT) म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीच्या सीमेवरील नवीन कृषी कायद्यांचा निषेध करणार्‍या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) शांततापूर्ण मार्गाने भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने देखील कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. AITWA चे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र आर्य म्हणाले, "इंधन दरवाढ आणि नवीन ई-वे बिलाच्या कायद्याच्या विरोधात सर्व राज्यस्तरीय परिवहन संघटनांनी या एकदिवसीय वाहतुकीच्या नॉन-ऑपरेशनला पाठिंबा दर्शविला आहे." दरम्यान या सगळ्याचा परिणाम देशातील अनेक सेवांवर होणार आहे. जाणून घेऊया त्याबद्द्ल...

# भारत बंदमध्ये 40,000 हून अधिक व्यापारी संघटना सहभागी झाल्यामुळे देशभरातील व्यापारी बाजारपेठा बंद राहतील. तरीही संबंधित संस्थांनी घेतलेल्या निर्णयांवर हे अवलंबून आहे.

# देशभरातील रस्ते वाहतूकीवर याचा परिणाम होऊ शकतो. एआयटीडब्ल्यूएने सर्व परिवहन कंपन्यांना सकाळी 6 ते 8 या दरम्यान वाहने पार्क करण्यास सांगितले आहे.

# कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण, लोडिंग/अनलोडिंग होणार नाही.

# चार्टर्ड अकाऊंट्स आणि टॅक्स अॅडव्होकेट्सच्या संघटनांनीही संपाला पाठिंबा दर्शविला आहे.

# त्यामुळे त्यांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

# सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्यानुसार महिला उद्योजक, लघुउद्योग, फेरीवाले आणि इतर लोक देखील बंदमध्ये सामील होतील.

# निषेध नोंदविण्यासाठी कोणताही व्यापारी जीएसटी पोर्टलवर लॉग इन करणार नाही.

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय दुकाने, दूध, भाजीपाला दुकाने इत्यादींवर भारत बंदचा परिणाम होणार नाही. तसंच बॅँक सेवांवर परिणाम न होण्याची शक्यता आहे.