बंगळुरु शहर पोलिसांनी (Bangalore Police) एका 29 वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. हा व्यक्ती एका मल्टीमीडिया कंपनीमध्ये कामाला आहे. त्याच्यावर एकदोन नव्हे तर तब्बल 50 लॅपटॉप (Laptop) चोरल्याचा आरोप आहे. त्याने चोरलेल्या लॅपटॉपची किंमत तब्बल 22 लाख रुपये इतकी आहे. कर्जबाजारीपणातून (Indebtedness) त्याने हे कृत्य केल्याचे समजते. पोलिसांनी त्याला होसूर येथील सिनेमागृहातून अटक करुन बंगळुरुला आणले. अटक केली तेव्हा त्याच्याकडून पाच लॅपटॉपही जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर सेंटर आणि टोमॅटो शेतीमध्ये नुकसान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण सायबर सेंटर चालवत असे शिवाय तो टोमॅटोची शेतीही करत असे. दोन्ही व्यवसायांमध्ये त्याला अपयश आल्याने त्याला 25 लाख रुपयांचा फटका बसला होता. त्यामुले पाठिमागील काही दिवसांपासून तो नैराश्येत होता. त्यातून त्याने व्हाईटफिल्ड कंपनीतून 50 लॅपटॉप चोरले. विशेष म्हणजे तो याच कंपनीत कामाला आहे. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, मरुगेश एम असे आरोपीचे नाव आहे. तो पदवीधर असून त्याने BCA पर्यंतचे शिक्षण तामिळनाडू येथील होस येथून घेतले आहे. (हेही वाचा, Theft: एक्स गर्लफ्रेंडशी बदला घेण्यासाठी तरुणाने महाविद्यालयाच्या वसतिगृहातून चोरला लॅपटॉप)
आरोपीकडून लॅपटॉप चोरीची कबुली
दरम्यान, मरुगेश याने आपण लॅपटॉप चोरल्याचे मान्य केले आहे. चोरलेले लॅपटॉप ठरावीक कालावधीनंतर त्याने जवळच्या गॅझेट दुरुस्तीच्या दुकानात विकल्याचेही त्याने सांगितले. मरुगन याने कामावर अचानक येणे बंद केले होते. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लॅपटॉप चोरी केल्याचे लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात 22 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीची संशयास्पद हालचाल लक्षात आली. त्यातून मुरुगन याच्यावरील संशय बळावला. (हेही वाचा, Theft For GF Birthday: गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी चोरी! नववीच्या विद्यार्थ्याने आईचे दागिने विकून प्रेयसीला गिफ्ट केला आयफोन)
कंपनीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपीस होसूर येथील सिनेमागृहातून अटक करुन बंगळुरुला आणण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच लॅपटॉप जप्त केले. त्याने आपण आणखी 45 लॅपटॉप चोरले असून त्याची विक्री केल्याचे सांगितले. त्याने चोरलेल्या सर्व लॅपटॉपची किंमत 22 लाख रुपये असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.
दरम्यान, व्यवसाय म्हटले की, त्यात चढ उतार येत असतात. त्यामुळे या चढ उतारांना घाबरुन अथवा कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्येत जाण्याचे काहीच कारण नाही. अतिरिक्त ताण घेतल्याने अथवा विचार केल्याने काही लोकांना नैराश्य येते ही बाब खरी असली तरी, त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार घेणे केव्हाही चांगले. पण, हे उपचार वेळीच झाले नाहीत तर सदर व्यक्ती चौरी, चुकीचे पाऊल यांसारखे निर्णय घेण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा वेळी त्याच्या कुटुंबीयांनी अशा व्यक्तीस मानसिक आधार देण्याची गरज असते, असे सामाजिक घडामोडींचे अभ्यासक सांगतात.