Begger (Pic Credit - )

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) पोलिसांनी भीक मागणाऱ्या (Beggars) लोकांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामधून 23 भिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी लोकांना भिक मागण्यास भाग पडणाऱ्या या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारालाही अटक केली आहे. हे लोक हैद्राबाद, सायबराबाद आणि रचकोंडा येथील ट्रॅफिक जंक्शनवर भीक मागून दरमहा दीड ते दोन लाख रुपये कमवत होते.

या प्रकरणी पोलिसांनी भिकाऱ्यांचा नेता अनिल पवार याला अटक केली असून तो कर्नाटकातील फतेह नगर, गुलबर्गा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी रामू, रघु, धर्मेंद्र यांच्यासह अनेक जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे लोकही गुलबर्गा येथील रहिवासी आहेत. ताडबून ते हायटेक सिटीपर्यंतच्या ट्रॅफिक सिग्नलवर या लोकांचे जाळे पसरले होते. हे लोक गरीब महिला, अल्पवयीन मुले, विधवा, शारीरिक अपंग यांचे शोषण करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल पवार हा शहरातील विविध चौकांमध्ये मुलांना अंमली पदार्थांचा पुरवठा करायचा. यानंतर ये-जा करणाऱ्यांची सहानुभूती मिळाल्यावर ही मुले भीक मागायची. भिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

हैदराबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भीक मागणारी कुटुंबे ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागून दररोज 4,000 ते 8,000 रुपये कमावतात. हे लोक इतरांना इथे भीक मागू देत नाहीत. त्यांच्या कुटुंबात पती-पत्नी, चार-पाच मुले आणि वडीलधारी मंडळी असतात. या लोकांच्याही भिक मागण्याच्या वेगवेगळ्या वेळा आणि ट्रॅफिक सिग्नल ठरलेले असतात. पोलिसांनी सांगितले की, भिकारी सकाळी 10 वाजता ऑटोरिक्षामधून येतात आणि संध्याकाळी त्यांचे काम संपवून ऑटोरिक्षाने घरी परततात.

महत्वाचे म्हणजे यातील अनेक भिकारी व्याजावर पैसे देण्याचे कामही करतात. हा त्याचा साईड बिझनेस आहे. यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळते. भीक मागून मिळणारी मोठ्या प्रमाणातील कमाई पाहून काही बेईमान लोक संघटित माफिया बनून काम करू लागले आहेत. या लोकांनी दिव्यांग, लहान मुले, वृद्ध स्त्री-पुरुष यांना काम द्यायला सुरुवात केली. दिवसभर भीक मागून केलेल्या कमाईतून प्रत्येकाला अवघे 200 ते 300 रुपये दिले जातात.