रामलल्ला | File Image

Ayodhya Unique Bank: रामलल्ला अभिषेक सोहळ्यानंतर अयोध्येचे (Ayodhya) नाव जागतिक पातळीवर प्रसिद्धीस आले. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने अयोध्येचे नाव चर्चेत आहे. आता इथल्या एका अनोक्या बँकेची चर्चा सुरु आहे. प्रभू रामाच्या भूमीत म्हणजे अयोध्या धाममध्ये एक अनोखी बँक आहे, जिथे पैशांची देवाणघेवाण होत नाही, मात्र या बँकेत 35,000 खातेदार आहेत. या बँकेत फक्त मन:शांती, श्रद्धा आणि अध्यात्म मिळते.

नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी ही बँक एक आंतरराष्ट्रीय बँक आहे, तिचे नाव आहे ‘आंतरराष्ट्रीय श्री सीताराम बँक’ असे आहे. या आध्यात्मिक बँकेची स्थापना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास यांनी नोव्हेंबर 1970 मध्ये केली होती. या बँकेचे यूएसए, यूके, कॅनडा, नेपाळ, फिजी, यूएईसह भारतात आणि परदेशात 35,000 हून अधिक खातेदार आहेत.

बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला पैसे जमा करावे लागत नाहीत, तर किमान 5 लाख वेळा वहीत 'सीताराम' लिहावे लागते आणि त्यानंतर पासबुक जारी केले जाते. बँकेचे व्यवस्थापक पुनित राम दास महाराज यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानंतर बँकेत दररोज येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्याप्रमाणे आपण आंतरिक शांती, श्रद्धा आणि पुण्य मिळवण्यासाठी देवी-देवतांच्या मंदिरात जातो, त्याचप्रमाणे हाताने 'सीताराम' लिहिलेली पुस्तिका बँकेत जमा करणे हीदेखील एक प्रकारची प्रार्थना आहे, असे पुनित राम दास महाराज यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Customer Takes Legal Action Against Zomato: गुरुग्राममध्ये अवघ्या 30 मिनिटांत पोहोचले 500 किमी लखनौमधील कबाब; ग्राहकाने झोमॅटोवर दाखल केला गुन्हा)

बँकेच्या संपूर्ण भारतात आणि परदेशात 136 शाखा आहेत. खातेदार पोस्टाने 'सीताराम' लिहिलेल्या पुस्तिका पाठवतात आणि इथे त्यांचा हिशोब ठेवला जातो. रामाचे नामस्मरण, जप आणि स्मरण यातून भाविकांना शांतता आणि खोल आध्यात्मिक समृद्धी मिळते, जी लिखाणाच्या माध्यमातून घडते. याबाबत बिहारच्या गया येथील जितू नागर सांगतात, गेली 14 वर्षे ते या बँकेला भेट देत आहेत. स्वतःच्या हाताने ‘सीताराम’ लिहिणे ही त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. मंदिरात प्रार्थना करण्याऐवजी, ते वहीत ‘सीताराम’ लिहितात. त्यांनतर या वह्या अयोध्येतील बँकेत जमा केल्या जातात. उत्तर प्रदेशातील बरेली येथील आणखी एक खातेदार उमन दास यांनी सांगितले की, त्यांनी 25 लाख वेळा 'सीताराम' लिहिले आहे.