Customer Takes Legal Action Against Zomato: आजकाल लोक झटपट फूडसाठी झोमॅटोवर (Zomato) फूड ऑर्डर करतात. एखादा स्पेशल पदार्थ खाण्यासाठी लोक कित्येक किलोमीटरवरील रेस्टॉरंटकडे ऑर्डर देतात आणि झोमॅटो ही ऑर्डर पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आता लखनौमध्ये तयार केलेले कबाब, 500 किलोमीटर दूर गुरुग्राममध्ये पोहोचले आहेत आणि तेही अवघ्या 30 मिनिटांत. विश्वास ठेवायला थोडे अवघड असलेली ही गोष्ट झोमॅटोवरून कबाब ऑर्डर करणाऱ्या ग्राहकाच्याही पचनी पडली नाही. त्यामुळे त्यानी झोमॅटो कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुरुग्रामच्या सौरव मॉलने लखनौहून कबाब मागवले होते. त्याने ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांनी ताजे कबाब त्याच्या दाराबाहेर आले. यानंतर त्याने झोमॅटो लीजेंड्सविरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे. (हेही वाचा: SpiceJet Layoff: स्पाइसजेट टाळेबंदी, 15% कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा)
झोमॅटोची एक खास सेवा आहे ती म्हणजे, लीजेंड सेवा (Legend Service). दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये ही लाँच करण्यात आली. या सेवेअंतर्गत, कंपनी तुम्हाला निवडक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स किंवा इतर शहरांमध्ये असलेल्या फूड आउटलेटमधून खाद्यपदार्थ वितरीत करते. सौरवने याच सब सर्व्हिसमधून चार डिश ऑर्डर केल्या होत्या. तीन डिश दिल्लीतील होत्या, तर एक लखनऊमधील होती. ऑर्डर केलेल्या वस्तूंमध्ये जामा मशिदीतील 'चिकन कबाब रोल', कैलाश कॉलनीतील 'ट्रिपल चॉकलेट चीजकेक', जंगपुरा येथील 'व्हेज सँडविच' आणि लखनऊमधील 'गलोटी कबाब' यांचा समावेश आहे.
मात्र ऑर्डर केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटात लखनऊमधील 'गलोटी कबाब'ची डिलिव्हरी झाली. त्यानंतर सौरवने झोमॅटो कंपनी आणि तिच्या या सेवेबाबत गुन्हा दाखल केला. झोमॅटोची लीजेंड सेवा बंद करण्यासाठी त्याने दिल्लीच्या स्थानिक न्यायालयात दाद मागितली आहे. कंपनीचा हा दावा खोटा असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीस्थित साकेत कोर्टाने या प्रकरणी झोमॅटोला समन्स पाठवले आहे.