Assam Assembly Election Results 2021: असाममध्ये भाजप पूर्ण बहुमताकडे, विजयाची  'ही' आहेत प्रमुख कारणे
Sarbananda Sonowal | (Photo Credits: ANI)

असम विधानसभा निवडणूक 2021 निकाल (Assam Assembly Election Results) पाहता भारतीय जनता पक्ष (BJP) स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. असममध्ये 10 पक्षांच्या आघाडीचे संयुक्त आव्हान भाजपपुढे होते. परंतू, भाजप या सर्वांना धोबीपछाड देत सत्तेवर येताना दिसतो आहे. या निकालासोबत असम राज्यात प्रथमच काँग्रेसेत्तर पक्ष दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत येताना दिसतो आहे. भाजप सोबत भाजपचे मित्रपक्षही जोरदार पुनरागमन करताना दिसत आहे. असम गण परिषद आणि यूनायटेड पीपल्स पार्टीचा समावेश आहे. अद्याप सर्व निकाल जाहीर झाला नसला तरी चित्र पुरेसे स्पष्ट झाले आहे. काय आहेत भाजपच्या या विजयाची कारणे? याबाबतचे हे काही ठळक मुद्दे.

  • भारतीय जनता पक्षाने असम विधानसभा निवडणुकीत केलेला प्रचार. त्यातील मुद्दे आणि आता दिसत असलेला निकाल पाहता हिंदू मतांचे समिकरण असममध्ये जुळून आले आहे. भारतीय हिंदू मतांचे ध्रुविकरण करण्यात यशस्वी झाली. येथे काँग्रेसमध्ये सहभागी असलेल्या बदरुद्दीन अजमल यांच्यावर भाजपने साधलेला निशाणा योग्य ठिकाणी लागल्याची चर्चा आहे. 2014, 2016 आणि 2019 च्या निवडणुकीपेक्षाही भाजपची या वेळची कामगिरी चांगली मानली जात आहे.
  • नागरिकता दुरुस्ती कायद्यावरुन असममध्ये जोरदार आक्रमकता पाहायला मिळाली. सीएएच्या मुद्द्यावर भाजप सुरुवातीच्या काळात काहीशी बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळाली. परंतू, त्यानंतर भाजपने अल्पावधीतच घुसखोरांचा मुद्दा पुढे केला आणि डाव पलटला. भाजपला यश मिळताना दिसत आहे.
  • मुख्यमंत्री सर्बानंत सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या राज्यात राबवलेल्या योजनाही विशेष फायदेशीर ठरल्य. या ठिकाणी असंख्य बेघरांना घरे, जमनी आणि शेकडो घरे निर्मिती करण्यात आली. त्याचा फायदा इथल्या सर्वसामान्यांना झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे भाजप विरोधी पक्षांचे मुद्दे खोडू शकल्याचा दावा आता भाजप करते आहे. असममधील चहाकामगारही भाजपच्या बाजूने दिसले. (हेही वाचा, Assembly Election Results 2021: एम करुणानिधी यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये प्रथमच DMK ची सत्ता; जाणून घ्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार MK Stalin यांच्याबाबत खास गोष्टी)
  • राजकीय अभ्यासक सांगतात की, असममध्ये भाजपने सोशल इंजिनियरींगचे राजकारण केले. हे राजकारण यशस्वी होताना दिसले. असममध्ये कार्बी, दिमासा, मीशिग, राभा आणि तिवा समुदायांची मते डोळ्यासमोर ठेऊन भाजपने उमेदवार दिले. त्याचा चांगलाच फायदा भाजपला झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, असममध्ये पहिल्यांदा 1978 मध्ये बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत आले. परंतू, हे सरकार अंतर्गत गटबाजीमुळे केवळ 18 महिन्यांतच कोसळले. त्यानंतर 1985 आणि 1996 मध्येही असम गण परिषदेच्या रुपात गैर काँग्रेसी सरकार बनले. हे सरकारही सलग सत्तेत राहीले नाही. 2001 ते 2016 पर्यंत असममध्ये मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार सलग सत्तेत राहिले. मात्र, आता या राज्यात भाजपने चांगलेच पाय रोवले आहेत.