भारताच्या सावित्री जिंदाल (Savitri Jindal) या आशियातील सर्वात श्रीमंत महिला (Asia's Richest Moman) बनल्या आहेत. त्यांनी चीनच्या यांग हुआनला (Yang Huiyan) मागे टाकले आहे. चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील संकट हे त्यामागचे कारण आहे. हुआनची कंपनी चीनमधील सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी आहे. चीनच्या मालमत्तेच्या संकटामुळे हुआनची कंपनी कंट्री गार्डन होल्डिंगसह देशातील इतर अनेक विकासकांवर परिणाम झाला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये, भारताच्या सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $18 अब्ज नोंदवली गेली.
हुआनच्या संपत्तीत यावर्षी 11 अब्ज डॉलर्सची घट झाली असून, या यादीत ती सावित्री जिंदाल यांच्या मागे गेली आहे. मात्र जानेवारीच्या तुलनेत जुलैमध्ये सावित्री जिंदाल यांच्या मालमत्तेत मोठी घट झाली आहे. सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत आणि 2021 च्या फोर्ब्सच्या 10 सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीतील एकमेव महिला देखील आहेत.
यांग हुआन या पाच वर्षांपासून आशियातील सर्वात श्रीमंत महिला होत्या. 2005 मध्ये, यांग हुआन यांना रिअल इस्टेट डेव्हलपरमध्ये त्यांच्या वडिलांची हिस्सेदारी मिळाली. यामुळे त्या जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनल्या. 2018 मध्ये त्यांनी चार दिवसांत दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. मात्र, या वर्षी त्यांनी अवघ्या एका दिवसात एक अब्ज डॉलरहून अधिकचे नुकसान सहन केले.
दुसरीकडे, सावित्री जिंदाल यांच्या निव्वळ संपत्तीत अलिकडच्या वर्षांत प्रचंड चढ-उतार झाले आहेत. एप्रिल 2020 मध्ये कोरोना महामारीच्या सुरुवातीस ही संपत्ती 3.2 अब्ज डॉलरपर्यंत घसरली होती आणि नंतर एप्रिल 2022 मध्ये ती $15.6 अब्ज पर्यंत वाढली. 2005 मध्ये सावित्री यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर सावित्री जिंदाल यांनी जिंदाल समूहाची सूत्रे हाती घेतली. ही कंपनी भारतातील स्टीलची तिसरी सर्वात मोठी उत्पादक आहे आणि सिमेंट, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे.
सावित्री जिंदाल यांचा जन्म 20 मार्च 1950 रोजी झाला. तिनसुकिया आसाममधील रहिवासी असलेल्या सावित्री यांचा विवाह 1970 मध्ये ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी झाला होता. जिंदाल कुटुंब हरियाणाच्या राजकारणात सक्रिय आहे. सावित्री जिंदाल यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांनी हिसार विधानसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीन निवडणुका जिंकल्या. ओमप्रकाश जिंदाल यांच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी हिसारमधून विधानसभा पोटनिवडणूक लढवली आणि हरियाणा सरकारमध्ये मंत्री बनल्या. (हेही वाचा: आशियाई देशांमध्ये भयानक मंदीची शक्यता, परंतु भारतासाठी आनंदाची बातमी; जाणून घ्या Bloomberg सर्वेक्षण अहवाल)
पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी घरकाम सोडून हा पतीचा व्यवसाय हाती घेतला. यासोबतच एक नेता आणि समाजसेविका म्हणूनही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळताना दिसत आहेत. नऊ मुलांची आई सावित्री जिंदाल यांना पृथ्वीराज, सज्जन, रतन आणि नवीन अशी चार मुले आहेत. पतीच्या निधनानंतर चारही मुलांमध्ये कंपन्यांची विभागणी झाली.