जगावर कोरोना विषाणू महामारीनंतर आता मंदीचा (Recession) धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर मंदीची चर्चा होती, मात्र ब्लूमबर्गच्या (Bloomberg) ताज्या अहवालात आशियाई अर्थव्यवस्थांवरही मंदीचा धोका अधिक वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या मते, आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि जपानलाही मंदीचा धोका आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे महागाई. यामुळे, सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांचे व्याजदर वाढवत आहेत, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या विकास दरावर होईल आणि जसजसा त्याचा वेग मंदावला जाईल, अर्थव्यवस्था मंदीत प्रवेश करेल.
ब्लूमबर्गने अर्थशास्त्रज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, श्रीलंका सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे आणि पुढील वर्षी मंदीचा धोका 85 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मागील सर्वेक्षणात श्रीलंकेवर मंदीचा धोका 33 टक्के होता. याशिवाय, न्यूझीलंडवर 33 टक्के, तैवानवर 20 टक्के, ऑस्ट्रेलियावर 20 टक्के आणि फिलिपाइन्सवर 8 टक्के मंदीची शक्यता आहे.
सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की, दक्षिण कोरिया आणि जपानवर मंदीची 25-25 टक्के शक्यता आहे, तर चीनवर 20 टक्के भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय हाँगकाँग आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर 20-20 टक्के मंदी येण्याची भीती आहे. इतर आशियाई देशांमध्ये मलेशियावर 13 टक्के, व्हिएतनामवर 10 टक्के, थायलंडवर 10 टक्के आणि इंडोनेशियावर 3 टक्के धोका आहे. सर्वेक्षणात भारत मंदीच्या धोक्यातून पूर्णपणे बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अर्थशास्त्रज्ञांनी भारतामध्ये मंदीची शून्य शक्यता दिली आहे. ते म्हणतात की, भारत इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. मूडीजचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ (आशिया-पॅसिफिक) स्टीव्हन कोरेन म्हणाले, आशियाई अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका असला तरी त्यांची स्थिती अमेरिका आणि युरोपीय देशांपेक्षा चांगली आहे. जर्मनी, फ्रान्ससारखे देश वस्तूंच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे अधिक त्रस्त आहेत. (हेही वाचा: अग्निपथ योजनेविरुद्ध झालेल्या आंदोलनामुळे रेल्वेचे 259.44 कोटी रुपयांचे नुकसान; 2000 गाड्या झाल्या होत्या रद्द)
आशियामध्ये मंदीचा धोका 20-25 टक्क्यांच्या श्रेणीत असताना, अमेरिकेत त्याचा धोका 40 टक्के आणि युरोपमध्ये 50-55 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ब्लूमबर्गच्या मते, इटलीमध्ये मंदीची 65 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के आणि जर्मनीमध्ये 45 टक्के शक्यता आहे. ब्रिटनमध्येही मंदीची 45 टक्के शक्यता आहे.