अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme) निषेधार्थ देशभरात जाळपोळ आणि तोडफोडीमुळे रेल्वेचे (Indian Railways) 259.44 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. मात्र, हा आकडा केवळ मालमत्तेच्या नुकसानीचा आहे. यादरम्यान रद्द झालेल्या गाड्यांमुळेhi (प्रवासी आणि मालगाड्या) रेल्वेचे मोठे नुकसान झाले. वैष्णव म्हणाले की, 14 जून ते 22 जूनपर्यंत 2132 गाड्या रद्द केल्यामुळे एकूण 102.96 कोटी रुपये भाडे परत करण्यात आले. या काळात अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने झाली.
संप आणि आंदोलनामुळे 2019-20 मध्ये रेल्वेला 151 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. त्याचप्रमाणे 2020-21 मध्ये 904 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 62 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर्षी केवळ अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात रेल्वेच्या 260 कोटी रुपयांच्या मालमत्तेची नासधूस करण्यात आली. अशाप्रकारे 2019 पासून आतापर्यंत रेल्वेला 1376 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
रेल्वेमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या आवारात दोन जणांचा मृत्यू झाला आणि 35 जखमी झाले. रेल्वे परिसरात हिंसाचार आणि जाळपोळ केल्याप्रकरणी देशभरात 2,642 लोकांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी 2019 मध्ये 95, 2020 मध्ये 30 आणि 2021 मध्ये 34 गुन्हे नोंदवले गेले. चालू वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे रेल्वे मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान बिहार आणि तेलंगणामध्ये झाले आहे. (हेही वाचा: ED कडून निरव मोदीची तब्बल 26 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त)
अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत एम आरिफ यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, रेल्वेला प्रवासी गाड्यांमधून तोटाच होतो. जर मालगाडीतून कमाई होत नसती तर रेल्वेला मोठा फटका बसला असता. रेल्वे प्रत्येक प्रवाशाकडून प्रवासाच्या सरासरी खर्चाच्या निम्मेच तिकीट म्हणून आकारते.