अरुण जेटली यांचा सक्रिय राजकारणातून संन्यास; नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवला निर्णय
Arun Jaitley (Photo Credits: IANS)

Modi Cabinet 2019: भाजप प्रणीत एनडीए सरकार मध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांना याबाबत एक पत्र लिहून माहिती दिली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण मंत्रीपदापासून दूर राहू इच्छितो. त्यामुळे संभाव्य मंत्रीमंडळात आपला समावेश करण्यात येऊ नये, असा उल्लेख या पत्रात असल्याचे समजते.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव अरुण जेटली यांचा समावेश Modi Cabinet 2019 मध्ये असणार नाही, अशी चर्चा यापूर्वीच राजकीय वर्तुळात रंगली होती. जेटली यांच्या पत्राने या चर्चेची एकप्रकारे पुष्टीच केली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात  म्हटले आहे की, 'गेली 18 महिन्यांपासून माजी प्रकृती ठिक नाही. गेल्या काही काळात ती अधीकच बिघडली आहे. आपण निवडणूक प्रचार काळात केदारनाथ जाण्यासाठी निघाले होतात तेव्हाच मी आपल्याला माझ्या प्रकृतीसंबंधी माहिती दिली होती. त्यामुळे मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करावे. जेणेकरुन मी माझ्या आरोग्याकडे अधिक चांगले लक्ष देऊ शकेल.'

दरम्यान, अरुण जेटली यांची प्रकृती अधिक बिघडल्याचे वृत्त रविवारी काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. अशा प्रकारच्या वृत्तापासून प्रसारमाध्यमांनी दूर राहिले पाहिजे असे जेटली यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. तसेच, अरुण जेटली हे मोदी यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्री बनण्याची शक्यातही या सूत्रांनी नाकारली आहे. (हेही वाचा, Modi Cabinet 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य चर्चीत चेहरे, पाहा कोणाला मिळणार संधी?)

दरम्यान, अरुण जेटली यांना आपल्या प्रकृतीवरील उपचारासाठी विदेशात जावे लागू शकते. 66 वर्षीय जेटली यांना  गेल्या आठवड्यात एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.