Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेशातील एका 25 वर्षीय मच्छीमाराने लोन अ‍ॅप एजंट्सच्या छळाला (Loan App Harassment) कंटाळून आपले जीवन संपवले. कर्जवसुली एजंट्सनी कथितपणे त्याच्या पत्नीचे फोटो विकृत पद्धतीने मॉर्फ करुन मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवले. या धक्कादायक प्रकारानंतर तो मनातून खचला आणि नैराश्येत ढकलला गेला. ज्यामुळे त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यातील लोन अॅपसद्वारे दिलेल्या कर्जांच्या वसूलीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनैतिक पद्धतींविषयी चिंता पुन्हा निर्माण झाली आहे.

काय घडले नेमके?

व्यवसायाने मच्छिमार असलेला नरेंद्र नवविवाहीत होता. अलिकडेच त्याने अखिला नावाच्या प्रेयसीसोबत आंतरजातीय विवाह केला होता. बदलत्या आणि खराब हवामानाचा फटका बसल्याने तो आगोदरच आर्थिक तंगीचा सामना करत होता. परिणामी तो मासेमारी करू शकत नव्हता. वाढता आर्थिक खर्च आणि कमी उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी त्याने एका लोन अ‍ॅपवरून 2,000 रुपयांचे कर्ज घेतले.

पत्नीचे फोटो मॉर्फ करुन छळ

नरेंद्र याने अ‍ॅपद्वारे घेलेल्या कर्जाची रक्कमही फारशी मोठी नव्हती. तरीदेखील अ‍ॅपच्या एजंट्सनी अल्पावधीतच त्याच्यावर कर्जाच्या परतफेडीसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. या वसूली प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधताना अपमानास्पद संदेशांचा अवलंब केला. त्यांनी त्याच्याशी फोनमध्ये असलेल्या संपर्क क्रमांकावरीलव्यक्तींसी संपर्क करत त्याच्या कर्जाचे तपशील सामायिक केले. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याच्या पत्नीचे विकृत फोटो प्रसारित करून अमानवी पाऊल उचलले. ही सर्व छायाचित्रे जेव्हा त्याच्याही फोनवर पोहोचली तेव्हा सर्व प्रकार त्याच्या ध्यानात आला.

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून पुढे आलेल्या वृत्तानुसार, नरेंद्र आणि त्याच्या पत्नीने कर्ज कंपनीस कर्जाची रक्कमही परत केली. तरीदेखील त्यांचा छळ थांबला नाही. शिवाय या दोघांना ओळखणाऱ्या फोनवरही त्यांचे मॉर्फ केलेले फोटो पोहोचले होते. त्यामुळे जवळच्या आणि संपर्कातील लोकांकडून या फोटोंबाबत सातत्याने विचारणा होत असे. ज्यामुळे या जोडप्याला प्रचंड अपमानीत व्हायला होत असे.त्यानंतर विवाहाला अवघे सहा आठवडेच झाले असताना नरेंद्र याने आत्महत्येचा मार्ग पत्करला.

लोन अ‍ॅप छळवणुकीच्या घटना वाढल्या

धक्कादायक असे की, आंध्र प्रदेशमध्ये केवळ एकाच आठवड्यात ऑनलाईन कर्ज घेऊन झालेल्या छळामुळे घडलेली ही तिसरी घटना आहे. त्यामुळे या राज्यात अशा प्रकारे कर्जाच्या विळख्यात सापडलेल्यांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. आणखी एका घटनेत, नंद्याल जिल्ह्यातील एका महिलेने छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक पोलिसांनी तिला वाचवले. किमान कागदपत्रांसह त्वरित कर्ज देण्यासाठी कर्ज अ‍ॅपने लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे अनेक लोक या अ‍ॅपद्वारे कर्ज घेण्यास प्राधान्य देत असल्याचेही पुढे आले आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता यांनी राज्य विधानसभेत लोन ऍप छळवणुकीच्या मुद्द्यावर बोलताना कठोर कारवाई करण्याचे वचन दिले. "हे अ‍ॅप्स लोकांना सुलभतेने कर्जाचे आमिष दाखवतात आणि नंतर वसुलीच्या अत्यंत आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामुळे कर्जदार अडचणीत येतात.

मदतीसाठी हेल्पलाईन

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी मानसिक आरोग्याशी झगडत असल्यास, कृपया मदतीसाठी खाली क्रमांकाशी संपर्क साधाः

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:

टेली मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891 4416; NIMHANS– + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड – 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – 080-23655557; iCALL - 022-25521111 आणि 9152987821; COOJ मेंटल हेल्थ फाउंडेशन (COOJ) – 0832-2252525.