Amul Topical: 'इट्स बटर, नॉट शटर', अमूल कंपनीच्या जाहिरातीत 'मुंबई नाईट लाईफ' विषयावर मजेदार भाष्य
Amul topical on Mumbai 24x7 (Photo Credits: Twitter)

मुंबई नाईट लाईफ (Mumbai Nightlife) हा सध्याचा राज्यभरातील चर्चेचा विषय. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राज्यातील महाविकासआघाडी सरकारने मुंबई शहर चोविस तास सुरु राहील असा निर्णय घेतला. ज्याला नाईट लाईफ हे नाव देण्यात आले. या निर्णयाचे सत्ताधारी पक्षाने समर्थन केले आहे तर, विरोधकांनी या निर्णयास विरोध केला आहे. अशात अमूल (Amul) कंपनीने व्यावसायिक संधी शोधली आहे. या कंपनीने आपल्या जाहिरातीत 'इट्स बटर, नॉट शटर' असे म्हणत 'मुंबई नाईट लाईफ' या विषयावर मजेदार भाष्य केले आहे. ही कंपनी देशभरात घडणाऱ्या विविध घटना, घडामोडींचा आधार घेत नेहमीच घेत असते.

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्यामुळे हे शहर चोविस तास सुरु राहवे. मुंबईच्या नागरिकांना रात्रीच्या वेळीही त्यांच्या मनाप्रमाणे शहरात हिंडता फिरता यावे अशी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भूमिका होती. हे सरकार सत्तेत येण्यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका मांडली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात आली. (हेही वाचा, गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अमूल कंपनीची खास श्रद्धांजली (Photo))

अमूल ट्विट

नाईट लाईफ या संकल्पनेखाली मुंबई शहर 24 तास सुरु राहिले तरी त्याला नियम आणि अटीही लागू आहेत. जसे की, रात्री दीड वाजलेनंतर मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. राज्य सरकारने ठरवुन दिलेल्या निश्चित वेळेनंतर रात्री मद्यविक्री करणारी दुकाने, बार, पब्ज सुरु ठेवण्यास कायद्याने बंदी असेन. तसेच, मुंबई महापालिकेने रात्री उशीरा बेस्ट बसेस सुरु ठेवण्याचाही विचार केला आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांची रात्रजीवन अनुभवताना फारशी गैरसोय होणार नाही. दुसऱ्या बाजूला उद्योग आणि रोजगारवाढीसही राज्य सरकारच्या या निर्णयामुळे फायदा होऊ शकतो.