Amarnath Yatra| ANI

समुद्रसपाटीपासून सुमारे 3888 मीटर उंचीवर असलेल्या श्री अमरनाथ गुहा (Holy Amarnath Cave) येथे लवकरच वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. प्रशासनाने गुहेकडे जाणाऱ्या यात्रा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामात गुंतलेल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने आपले ट्रक आणि लहान पिकअप वाहने पवित्र गुहेकडे पाठवली आहेत. पवित्र गुहेजवळ सुरू असलेल्या कामासाठी या वाहनांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत भाविकांना पायी, घोडा, पालखी किंवा हेलिकॉप्टरनेच प्रवास करता येत होता, मात्र लवकरच वाहनाने बाबा अमरनाथ गुहेजवळ जाता येईल.

पवित्र गुहेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक बालटाल ते पवित्र गुहेपर्यंत आणि दुसरा पहलगामच्या चंदनबारी ते गुहेपर्यंत. हे दोन्ही मार्ग कच्चे असून ते डोंगरातून जातात. बालटाल ते पवित्र गुहेपर्यंत सुमारे 14 किलोमीटरच्या मार्गावर बहुतांश ठिकाणी रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

या प्रवासी मार्गाचे रुंदीकरण करून ते वाहनांच्या वाहतुकीसाठी योग्य बनविण्याची जबाबदारी गेल्या वर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या बीकन विंगकडे सोपवण्यात आली होती. या महिन्याच्या 5 ऑक्टोबरला काली माता टॉपजवळ बीकन कामासाठी लागणारी वाहने पोहोचली होती. त्याआधी तीन दिवस अगोदर रस्ता तयार करून ही वाहने पवित्र गुहेकडे नेण्यात आली आहेत. चंदनबारी-पवित्र गुंफा रस्त्यावरही काम वेगाने सुरू आहे.

भूस्खलनाबाबत संवेदनशील असलेल्या भागातही सुरक्षा भिंती तयार केल्या जात आहेत. बीकनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर या मार्गाचे काम सध्याच्या हवामानानुसार केव्हाही थांबू शकते, त्यामुळे उर्वरित वेळेत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आवश्यक उपकरणे व कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जड यंत्रसामग्री यात्रा मार्गाच्या विविध भागात पोहोचवण्यात आली आहे. यात्रेच्या मार्गावर आता ट्रक आणि लहान पिकअप वाहनांचाही वापर केला जात आहे. डोमेलमध्ये यापूर्वी अशा प्रकारची वाहने किंवा अवजड यंत्रसामग्री वापरली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Gujarat Bridge Collapse Video: गुजरातमधील पालनपूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही)

चंदनबारी ते गुहा या मार्गावर शेषनाग ते पंचतर्णी दरम्यान 10.8 किमी लांबीचा बोगदा बांधण्याची योजना आहे, जेणेकरून भाविकांना दरड कोसळणे, पाऊस, बर्फवृष्टी या काळात आपला प्रवास थांबवावा लागू नये आणि कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये. पंचतर्णी ते पवित्र गुहेपर्यंत पाच किलोमीटर लांबीचा आणि साडेपाच मीटर रुंद पक्का रस्ता तयार करण्यात येत आहे.