Air pollution मुळे उत्तर भारतीयांचे आयुर्मान 9 वर्षांनी घटू शकते; जाणून घ्या काय आहे महाराष्ट्राची परिस्थिती
File image of air pollution (Photo Credits: PTI)

वायू प्रदूषण (Air Pollution) हे आपल्या आरोग्यावर किती घातक परिणाम करू शकते हे आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. वायू प्रदूषण केवळ रोगांनाच कारणीभूत ठरत नाही, तर आपले आयुष्यही (Life) कमी करत आहे. भारताच्या वायू प्रदूषणाची पातळी कालांतराने भौगोलिकदृष्ट्या विस्तारली आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ते इतके वाढले आहे की व्यक्तीचे सरासरी आयुर्मान अतिरिक्त 2.5 ते 2.9 वर्षे कमी होत आहे. एका नव्या अहवालात प्रदूषणाच्या परिणामांबद्दल इशारा देण्यात आला आहे. शिकागो विद्यापीठाच्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (AQLI) च्या अहवालात म्हटले आहे की भारत हा जगातील सर्वात प्रदूषित देश आहे.

पुढे म्हटले आहे की, भारतामध्ये 48 दशलक्षाहून अधिक लोक किंवा देशाच्या लोकसंख्येच्या 40 टक्के लोक उत्तर गंगेच्या मैदानावर राहतात, जेथे प्रदूषणाची पातळी ही जगात इतरत्र आढळणाऱ्या पातळीपेक्षा जास्त आहे. विद्यापीठाच्या 'एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट'ने केलेल्या अभ्यासामध्ये, एखादी व्यक्ती स्वच्छ हवेत श्वास घेत असल्यास किती काळ जगू शकते हे दिसून येते.

अहवालात म्हटले आहे की, जर 2019 च्या प्रदूषणाची पातळी अशीच राहिली तर उत्तर भारतातील रहिवासी त्यांचे नऊ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान गमावण्याच्या मार्गावर आहेत, कारण हा प्रदेश जगातील वायू प्रदूषणाच्या अत्यंत गंभीर पातळीला तोंड देत आहे. अहवालात म्हटले आहे की 2019 मध्ये भारताची सरासरी 'पार्टिक्युलेट मॅटर कॉंसंट्रेशन' (हवेत प्रदूषित सूक्ष्म कणांची उपस्थिती) 70.3 मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर होती, जी जगात सर्वात जास्त आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) 10 मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटरपेक्षा 7 पट जास्त होती.

पुढे म्हटले आहे की, काही दशकांपूर्वीच्या तुलनेत प्रदूषण हे आता केवळ भारताच्या गंगेच्या मैदानी प्रदेशातच नाही, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही प्रदूषण लक्षणीय वाढले आहे. या राज्यांमध्ये सरासरी व्यक्तीचे आयुर्मान आता 2000 च्या सुरुवातीच्या तुलनेत अतिरिक्त 2.5 ते 2.9 वर्षे कमी झाले आहे. बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तानसाठी, AQLI डेटा दर्शवितो की डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रदूषण कमी झाल्यास सरासरी व्यक्ती 5.6 वर्षे अधिक जगेल. (हेही वाचा: GST: सरकारच्या तिजोरीत ऑगस्ट महिन्यात 1.12 लाख कोटी रुपये GST collection जमा

दरम्यान, बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तानची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या जवळपास एक चतुर्थांश आहे आणि सातत्याने या देशांचा समावेश जगातील पहिल्या पाच सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये होत आहे.