Air India (संग्रहित संपादित प्रतिमा)

एअर इंडियाने (Air India) 2023 मधील सर्वात मोठा सेल सुरु केला आहे. विशेषत: परदेशात जाणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कंपनीने गुरुवार, 17 ऑगस्टपासून 96 तासांचा म्हणजेच 4 दिवसांचा सेल सुरू केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत तिकीट बुक करणाऱ्यांना थेट 30 टक्के सवलत दिली जाईल. याचा अर्थ एखादे तिकीट 10,000 रुपयांचे असेल, तर 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान बुक केल्यास ते केवळ 7,000 रुपयांना मिळेल.

गुरुवारी हा सेल सुरू करताना, एअर इंडियाने सांगितले की आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी तिकीट बुक करणाऱ्यांना थेट 30 टक्के सूट दिली जाईल. कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘टाटा समूहाने आपल्या प्रवाशांना एक मोठी भेट दिली आहे. प्रवासी 17 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत एअर इंडियाच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे त्यांच्या आवडत्या स्थळांसाठी आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक करू शकतात, तेही पूर्ण 30 टक्के सवलतीसह.’

एअर इंडियाच्या वेबसाइटनुसार, इकॉनॉमी क्लासचे हवाई भाडे 1,470 रुपयांपासून सुरू होत आहे, तर बिझनेस क्लासचे विमान तिकीट 10,130 रुपयांपासून होते. कंपनीने एका ट्विटमध्ये सांगितले आहे की, हा सेल 20 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजता संपेल. या सेलमध्ये 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रवास करता येईल. या सेलद्वारे सार्क देशांमध्ये प्रवास करता येणार आहे. एअर इंडियाने सांगितले आहे की, 1 सप्टेंबरपासून सार्क देशांमध्ये प्रवास करणे शक्य होणार असले तरी काही देश असे आहेत जेथे 15 सप्टेंबरनंतर प्रवास सुरू होईल. (हेही वाचा: Most Affordable Homes: देशात अहमदाबाद ठरते राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहर; मुंबई सर्वात महाग, जाणून घ्या यादी)

वेबसाइटनुसार, युरोप, यूके, दक्षिण-पूर्व आशिया आणि आखाती देशांचा प्रवास 15 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत करता येईल. यामध्ये सौदी अरेबियाचाही समावेश आहे. एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप व्यतिरिक्त, अधिकृत ट्रॅव्हल एजंट आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट (OTA) द्वारे केलेली बुकिंग देखील सवलतीच्या तिकिटांसाठी पात्र असतील.