प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संकट जगातील जवळजवळ प्रत्येक देशात उद्भवले आहे. जगभरात कोरोनाला बळी पडलेल्यांची संख्या 50 लाखांवर गेली आहे. भारतातही वेगाने कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक पत्रकार परिषद पार पडली. कोरोना विषाणूविषयी, आयसीएमआरचे डॉ. रमन आर. गंगाखेडकर म्हणाले की, आज (शुक्रवार) दुपारी एक वाजेपर्यंत कोविड-19 च्या 27,55,714 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी 18,287 चाचण्या या खासगी लॅबमध्ये घेण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, सलग चार दिवसांपासून दररोज 1 लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड-19 चे 3,234 रुग्ण गेल्या 24 तासांत बरे झाले आहेत व ही समाधानकारक बाब आहे. एम्पॉवर्ड ग्रुप 1 चे अध्यक्ष डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, 'आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 19 तारखेला 1 कोटी उपचार पूर्ण झाले. जेव्हा आम्ही देशात लॉक डाउन सुरू केले, तेव्हा कोरोना विषाणूच्या बाबतीत दुप्पट होण्याचा दर 3.4 दिवस होता, आज ते 13.3 दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून देशात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये होणारी वाढ कमी केली. त्याचबरोबर आतापर्यंत 48,534 कोविड-19 रूग्ण बरे झाले आहेत, जे आतापर्यंतच्या एकूण प्रकरणांच्या 41 टक्के आहेत. (हेही वाचा: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, 6088 नव्या रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,18,447)

त्यांनी पुढे सांगितले की, सध्या कोरोना व्हायरसची सक्रीय प्रकरणे (21 मे पर्यंत) काही राज्ये आणि शहरे/जिल्ह्यात केंद्रित आहेत. देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांपैकी 5  राज्यांत सुमारे 80 टक्के प्रकरणे आहेत, 5 शहरांत 60 टक्क्यांहून अधिक प्रकारेण आहेत, 10 राज्यात 90 टक्क्यांहून अधिक आणि दहा शहरांत 70 टक्क्यांहून अधिक प्रकरणे आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, विविध अभ्यासानुसार लॉकडाऊनने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. लॉकडाउन झाले नसते तर देशात संक्रमित लोकांची संख्या 29 लाखांपर्यंत पोहोचली असती, व 37 ते 78 हजार लोकांचा मृत्यू झाला असता.