Pregnant Women प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Man Killed Pregnant Wife: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय पुरूषाने आपल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची प्रसूतीच्या एक दिवस आधी गळा दाबून हत्या (Murder) केली. के. अनुषा असं महिलेचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, के. अनुषा (वय, 27) ही मूळची अनकापल्ले जिल्ह्यातील अड्डुरू येथील रहिवासी होती. तिचे आणि तिचे पती जी. ज्ञानेश्वरचे लग्न दोन वर्षांपासून झाले होते. ते पीएम पालेम पोलिस स्टेशन हद्दीतील मधुरावाडा परिसरात राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हे जोडपे प्रसूतीपूर्व तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, जिथे डॉक्टरांनी गर्भधारणेच्या प्रगतीमुळे तातडीने दाखल करण्याचा सल्ला दिला होता. दुर्दैवाने, त्याच रात्री उशिरा, ज्ञानेश्वरने अनुषाच्या मित्रांना आणि कुटुंबियांना फोन करून ती अचानक बेशुद्ध पडल्याचा दावा केला. तिला तातडीने अरिलोवा येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी किंग जॉर्ज हॉस्पिटल (केजीएच) येथे पाठवण्यात आला. (हेही वाचा - Bengaluru Murder Case: बेंगळुरूमध्ये भयानक हत्याकांड! पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; आरोपीला अटक)

पोलिसांनी घातपाताचा संशय घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, ज्ञानेश्वरने आपल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. अनुषाने वारंवार केलेल्या भावनिक छळाच्या आरोपांचा उल्लेख करत ज्ञानेश्वरने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबूली दिली. अनुषाच्या कुटुंबाने ज्ञानेश्वरवर तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे, ज्यामध्ये त्याने अनुषाला कर्करोग झाल्याचे सांगितले होते आणि तिला सोडून जाण्यास भाग पाडले होते. तरीही, तिने त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा -Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक)

अनुषाच्या कुटुंबाला लग्नाची माहिती होती, परंतु प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, ज्ञानेश्वरच्या कुटुंबाने कधीही हे नाते पूर्णपणे स्वीकारले नव्हते. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे आणि गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.