स्तनांचा कर्करोग हा केवळ महिलांना होणारा आजार असल्याचे अनेकांना वाटते. पण तसे नाही. पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग (Male Breast Cancer) होतो. दिल्ली येथील एका खासगी रुग्णालयात नुकतेच एका 70 वर्षीय पुरुषाला स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) असल्याचे निदान झाले आहे. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये पुरुषांना स्तनांचा कर्करोग आढळून येतो. पटपडगंज येथील मॅक्स सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल च्या डॉक्टर मीनू वालिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सप्टेंबर 2021 मध्ये रुग्णाची तपासणी करण्यात आली. यात त्याला स्तनांचा कर्करोग असल्याचे आढळून आले.
ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. वैद्यकीय पद्धतीने त्याच्या स्तनाचा एक भाग काढण्यात आला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर केमोथेरपी सुरु आहे. रुग्णावर उपचार आणि केमोथेरपीचा चांगला परिणाम होत असून, त्याचे शरीर उपचारांना साथ देत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. परुषांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याची प्रकरणे अगदीच दुर्मिळ असतात. या आजाराचे योग्य वेळीच निदान झाले तर उपचार करणे सोपे आणि फायदेशीर ठरते असेही डॉक्टर म्हणाले. एनडीटीव्ही इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Breast Cancer Awareness Month : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात या '6' पदार्थांचा समावेश करा !)
स्तनांमधील पेशी काही कारणाने गरजेपेक्षा अधिक प्रमाणात वाढतात. तसेच, आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात प्रसरण पावतात तेव्हा स्तनांचा कर्करोग होतो, असे डॉक्टर सांगतात. पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अगदीच दुर्मिळ आहे. मात्र, महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. प्रामुख्याने वृद्धापकाळात महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय, प्रदीर्घ काळ मासिक पाळी, कुटुंबात स्तनांच्या कर्करोगाची अनुवंशिकता, स्त्रीची मासिकपाळी बंद झाल्यानंतर (Menopause) येणारा लठ्ठपणा, अधिक प्रमाणात मद्यसेवन, चरबीयुक्त आहार, पहिल्या गर्भधारणेस लागणारा विलंब यांसारख्या इतरही काही कारणांमुळे स्तनांचा कर्करोग महिलांमध्ये वाढण्याचे प्रमाण अधिक असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते.
वेळीच निदान झाल्यास स्तनांच्या कर्करोगावर उपचार होणे शक्य असते. अशा वेळी महिलांना मॅमोग्राफी स्क्रीनिंग (Mammography Screening) करण्याचा सल्ला दिला जातो. 45 ते 54 वर्षे वयाच्या महिलांना आणि 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना दोन वर्षांतून एकदा मॅमोग्राफी स्क्रीनिंग (Mammography Screening) करण्यास डॉक्टर सांगू शकतात.