Pay Commission representative image (Photo Credit: File Image)

देशातील 1.2 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लवकरच वाढ (Salary Hike) होऊ शकते. सरकार 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी संसदेत सादर होणाऱ्या वार्षिक बजेटमध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेची घोषणा करू शकते. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची संभाव्य घोषणा आणि 186% पगारवाढीशी संबंधित अटकळ चर्चेचे केंद्र बनले आहेत.

कर्मचारी संघटनांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली-

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या पूर्व-अर्थसंकल्पीय बैठकीत, 10 केंद्रीय कामगार संघटना आणि भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारला विलंब न करता 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची विनंती केली. पगारवाढ आणि इतर सवलतींबाबतच्या त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी 8 वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संघटनांच्या मागण्यांच्या आधारे सरकारने 8 वा वेतन आयोग स्थापन केल्यास सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ शक्य आहे.

7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर रोजी संपणार-

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करण्यासाठी भारत सरकार दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते. 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7 व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याच्या शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या. त्याची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल. त्यानुसार पुढील वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार आहे, त्याचा 2025 पासून विचार करावा लागेल. म्हणूनच सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात 8 वा वेतन आयोग जाहीर करेल, अशी आशा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

पगारात 186 % वाढ होण्याची शक्यता-

जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टरच्या वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारात 186% पर्यंत वाढ करणे शक्य आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये असून ते 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते. त्याचप्रमाणे पेन्शनधारकांची मासिक पेन्शन 9,000 रुपयांवरून 25,740 रुपयांपर्यंत वाढू शकते. (हेही वाचा: 7th Pay Commission: 56% महागाई भत्ता निश्चित, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगारात होणार मोठी वाढ)

फिटमेंट फॅक्टर-

फिटमेंट फॅक्टर हा गुणांक आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन मोजले जाते. 7 व्या वेतन आयोगात हा घटक 2.57 होता, तर 8 व्या वेतन आयोगात तो 2.86 पर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. 8व्या वेतन आयोगात तो खरच 2.86 पर्यंत वाढवला तर, पगार 20,000 x 2.86 = 57,200 रुपये होईल. त्याचप्रकारे पेन्शनमध्ये 9,000 रुपयांवरून 25,740 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.