बायकोने नेहमी पतीची आज्ञा पाळली पाहिजे यावर बहुतेक भारतीय पूर्णपणे किंवा काही प्रमाणात सहमत आहेत. एका अमेरिकन थिंक टँकने नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे. प्यू रिसर्च सेंटरचा (Pew Research Center) हा नवीन अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालामध्ये भारतीय लोक घरात आणि समाजात जेंडर भूमिकांकडे कसे पाहतात हे दर्शवण्यात आले आहे. हा अहवाल 29,999 भारतीय प्रौढांवर 2019 च्या उत्तरार्धापासून ते 2020 च्या सुरुवातीच्या काळात केलेल्या अभ्यासावर आधारित आहे.
अहवालात म्हटले आहे की, ‘भारतीय प्रौढांनी जवळजवळ ही गोष्ट मान्य केली आहे की, महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळणे आवश्यक आहे. 10 पैकी आठ जणांनी ही गोष्ट अतिशय महत्वाची असल्याचे सांगितले. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत पुरुषांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही भारतीयांना वाटते.’ यामध्ये असेही म्हटले आहे की, ‘जेव्हा नोकऱ्यांची कमतरता असते तेव्हा पुरुषांना काम करण्याचा अधिकार महिलांपेक्षा जास्त असावा. या या मताशी जवळपास 80 टक्के लोक सहमत आहेत.'
अहवालात पुढे असे म्हटले आहे की, 10 पैकी जवळपास नऊ भारतीय (87 टक्के) 'पत्नीने नेहमी पतीच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे’ याबाबत पूर्णपणे किंवा काही प्रमाणात तरी सहमत आहेत. हा दृष्टिकोन बहुतांश भारतीय महिलांनी मान्य केला आहे. मात्र, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांसारख्या नेत्यांचा संदर्भ देत, भारतीयांनी महिलांना राजकारणी म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे.
अभ्यासानुसार, बहुतेक पुरुषांनी सांगितले की महिला आणि पुरुष दोघेही एकसमान चांगले नेते आहेत. त्याच वेळी, केवळ एक चतुर्थांश भारतीयांनी सांगितले की पुरुष स्त्रियांपेक्षा चांगले नेते बनतात. यासोबत मुलांच्या बाबतीत, भारतीयांचे मत आहे की, कुटुंबात किमान एक मुलगा (94 टक्के) आणि एक मुलगी (90 टक्के) असावी. (हेही वाचा: Rape: विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या डीनला अटक)
बहुतेक भारतीय (63 टक्के) म्हणतात की पालकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी प्रामुख्याने मुलांवरच असली पाहिजे. मुस्लिमांमध्ये 74 टक्के, जैन 67 टक्के आणि हिंदू 63 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, पालकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मुलांवर असली पाहिजे.