2-DG Drug: उद्या रिलीज होणार DRDO च्या अँटी कोविड-19 औषधाची पहिली बॅच; Covid-19 लढाईत मदत मिळण्याची आशा
Medical Workers (Photo Credits: IANS)

देशात कोरोना व्हायरसविरूद्धचे (Coronavirus) युद्ध सुरु आहे. सध्या विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येत घट होताना दिसून आहे. अशात, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केलेले कोरोना विरुद्धचे औषध, 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) (2-Deoxy-D-glucose) ची पहिली बॅच सोमवारी रिलीज केली जाईल. हे औषध कोरोना विरुद्धच्या लढाईतील मैलाचा दगड ठरू शकते. 2-डीजीची पहिली तुकडी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहे. हे औषध हैदराबादच्या डॉ रेड्डीज लिमिटेडसोबत विकसित केले गेले आहे.

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोजला आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 8 मे रोजी मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते की, तोंडावाटे घेतले जाणारे हे औषध कोरोनाच्या मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी सहाय्यक उपचार पद्धती म्हणून वापरण्यास परवानगी होती. क्लिनिकल चाचणीमध्ये असे आढळले की, 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना लवकर ठीक होण्यास मदत करते तसेच रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबनही कमी करते.

संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, कोविड-19 च्या सुरू असलेल्या दुसर्‍या लाटेमुळे मोठ्या संख्येने रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे व त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. हे औषध संक्रमित पेशींवर कार्य करीत असल्याने या औषधामुळे अनेकांचे प्राण वाचण्याची आशा आहे. हे औषध कोविड-19 रूग्णांचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी करते. हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओच्या प्रतिष्ठित प्रयोगशाळेत, न्यूक्लियर मेडिसिन आणि संबद्ध विज्ञान संस्था हे औषध विकसित केले आहे. (हेही वाचा: SOPs on COVID-19: ग्रामीण भागामधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, स्क्रीनिंग आणि क्वारंटाईवर देण्यात येणार भर)

असे सांगितले गेले आहे की, सामान्य रेणू आणि ग्लूकोज अनुरुपतेमुळे हे औषध तयार केले जाते आणि त्यामुळे देशात ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. सहाय्यक पद्धत ही एक उपचार आहे जी प्राथमिक उपचारात मदत करण्यासाठी वापरली जाते. 2-डीजी औषध पाकीटात पावडरच्या स्वरूपात येते, जे पाण्यात मिसळून घ्यावे लागते.