प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

SOPs on COVID-19: देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव सुरू आहे. दुसर्‍या लाटेत शहर व ग्रामीण व आदिवासी भागात साथीचा रोगाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने खेडे व आदिवासी भागातील संसर्ग रोखण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्क्रिनिंग, चाचण्या आणि क्वारंटाईवर यावर जोर दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ग्रामीण व आदिवासी भागांकरिता जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, आशा कामगारांना प्रत्येक गावात सर्दी-तापाचे परीक्षण करावे लागेल. तसेच आरोग्य स्वच्छता आणि पोषण समिती देखील असेल. त्याचवेळी, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, त्यांना ग्रामीण पातळीवरील सामुदायिक आरोग्य अधिकारी यांना भेट देण्याची सूचना देण्यात आली आहे. (वाचा - Delhi Lockdown Extended: राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊनचा काळावधी 7 दिवसांनी वाढवला; 24 मे पर्यंत कायम राहणार निर्बंध)

या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्या रुग्णांना आधीचं गंभीर आजारांचा संसर्ग झाला आहे किंवा ऑक्सिजनची पातळी कमी आहे अशा रुग्णांना मोठ्या आरोग्य संस्थांमध्ये पाठवावे. सर्दी-ताप आणि श्वसनाच्या समस्यांसाठी प्रत्येक उपकेंद्रात ओपीडी चालविली पाहिजे. यासाठी त्याची वेळ निश्चित केली पाहिजे. एखाद्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास, त्यांची आरोग्य केंद्रांवर अँटीजन चाचणी करण्यात यावी किंवा त्यांचे नमुने तपासणीसाठी जवळच्या कोविड चाचणी केंद्रात पाठविण्यात यावेत.

आरोग्य अधिकारी आणि एएनएम यांना अँटीजन चाचण्यांचे प्रशिक्षण देखील दिले पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात अँटीजन चाचणी किट उपलब्ध करुन देण्यात यावेत. आरोग्य केंद्रांवर तपासणी केल्यावर, चाचणी अहवाल येईपर्यंत रुग्णाला स्वतंत्र राहण्याचा सल्ला दिला जावा.

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सुमारे 80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये कमी लक्षणं दिसून येत आहे. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. हे रुग्ण घरे किंवा कोविड सेंटरमध्ये अलग ठेवण्यात यावेत. या रुग्णांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.