नवे सरन्यायाधीश शरद बोबडे या मराठी माणसाच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Justice Sharad Arvind Bobde (Photo Credits: Supreme Court website)

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (hief Justice of India) म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे (Sharad Arvind Bobde) हे येत्या 18 नोव्हेंबर 2019 या दिवशी पदभार स्वीकारतील. सरन्यायाधीश हे जात, धर्म, प्रदेश, पक्षनिरपेक्ष असे स्वतंत्र पद असले तरीही कोणत्याही मराठी माणसाला बोबडे यांचा अभिमान वाटेल हे नक्की. मूळचे नागपूर येथील असलेल्या शरद बोबडे यांच्या रुपाने प्रदीर्घ काळानंतर एका मराठी व्यक्तीस हा बहुमान मिळत आहे. अल्पावधीतच सेवानिवृत्त होत असलेले मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. न्यायमूर्ती गोगोई यांच्या शिफारशीवर स्वाक्षरी करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी बोबडे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. बोबडे हे 47 वे सरन्यायाधीश असतील. या निमित्ताने जणून घेऊया शरद बोबडे यांच्या आयुष्याबाबत.

मूळचे नागपूरचे असलेल्या शरद बोबडे यांचा जन्म नागपूर येथेच 24 एप्रिल 1956 या दिवशी झाला. शरद बोबडे यांना कायदा आणि न्यायालयीन कारभार आदी विषयाची ओळख जन्मापासूनच झाली. त्यांचे वडील अरविंद बोबडे हे प्रसिद्ध विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. त्यामुळे आपल्या वडीलांच्याच क्षेत्रात त्यांचे मन विशेष रमले. ज्यामुळे पुढे ते कायदा, न्याय आणि वकिली आदी विषयांकडे वळले.

न्या. बोबडे यांचे शालेय शिक्षण नागपूर येथेच पार पडले. तर, 1978 मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी संपादन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्याल हे तेव्हा नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित होते. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी नागपूर खंडपीठात वकिली सुरु केली. वकिली क्षेत्रात न्या. शरद बोबडे यांचा अल्पावधीतच जम बसला. त्यामुळे सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातूनही त्यांची दखल घेतली जाऊ लागली. पुढे 1998 मध्ये विरष्ठ अधिवक्तापदी त्यांची निवड झाली तर, 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सूत्रे हाती घेतली. (हेही वाचा, न्यायमूर्ती रंजन गोगोई कडून शरद बोबडे यांच्या नावाची भारताच्या 'सरन्यायाधीश' पदासाठी शिफारस)

न्या. बोबडे यांचा न्यायाधीशपदाचा प्रवास पुढे कायम राहिला. 16 ऑक्टोबर 2012 मध्ये ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले. तर, वर्षभरात म्हणजेच 12 एप्रिल 2013 या दिवशी न्या. बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी यांच्यासोबत न्या. बोबडे यांचा शपथविधी पार पडला होता.

दरम्यान, 2016 मध्ये नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे) कुलपती म्हणूनही न्या. बोबडे यांची नियुक्ती झाली. विशेष असे की, एकेकाळी ज्या नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली त्याच नागपूर विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम करण्याचा मान न्या. बोबडे यांना मिळाला. दरम्यान, 2021 मध्ये सेवानिवृत्त होत असल्याने भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी न्या. बोबडे यांना केवळ दोन वर्षेच मिळणार आहे.