शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना 'सल्ला देत हल्ला' म्हणाले, 'गांधी कुटुंबाने देशासाठी केलेल्या त्यागाचे भान ठेवा'
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी कुटुंबावर सातत्याने करत असलेल्या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. हे टीकास्त्र सोडताना पवार यांनी मोदींना सल्ला देत हल्ला केला आहे. पवार म्हणाले, 'पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक सभा आणि भाषणातून सांगतात की, एका परिवाराने देशावर राज्य केले. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की, त्याच परिवाराने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. बलीदान दिले आहे', पवार यांच्या बोलण्याचा रोख काँग्रेस आणि गांधी कुटुंबाकडे होता.

शरद पवार यांनी पुढे सांगितले की, 'पंडीत जवाहरलाल नेहरु अनेक वेळा तुरुंगात गेले. तसेच, देशातील सर्वच लोकांना माहिती आहे की, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली आहे.' शरद पवार इतके बोलून थांबले नाहीत तर, भाजप आणि मोदींवर टीका करताना पुढे त्यांनी असेही म्हटले की, 'आपण विकासाचे स्वप्न दाखवले. पण, दाखवलेल्या स्वप्नांपैकी किती स्वप्नं पूर्ण झाली? हे दाखवण्यासठी आपल्याकडे काहीच नाही. म्हणूनच आपण केवळ एका कुटुंबाबाबत बोलता आहात.' (हेही वचाा, २०१९मध्ये मोदींची खुर्ची जाणार, माझी भूमिका महत्त्वाची राहणार; शरद पवार यांचे भाकीत)

दरम्यान, शरद पवार यांनी २०१९मध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांची आघाडी आवश्यक असल्याच्या मुद्दयावर पुन्हा एकदा जोर दिला. एका खासगी वृत्तवाहीनिला मुंबईत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतही पवारांनी हा विचार बोलून दाखवला होता. या मुलाखतीत बोलताना भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी माझी भूमिका महत्त्वाची राहील असेही पावार यांनी या मुलाखतीत म्हटले होते.