देशातील सर्वात श्रीमंत कौटुंबिक व्यवसायांच्या (Most Valuable Family Businesses) यादीत अंबानी कुटुंब अव्वल आहे. बार्कलेज-हुरुन इंडियाच्या सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय 2024 च्या यादीनुसार, अंबानी कुटुंबाचे मूल्य 25.75 ट्रिलियन आहे, जे भारताच्या जीडीपीच्याच्या सुमारे 10% आहे. अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली या कौटुंबिक व्यवसायाचे साम्राज्य ऊर्जा, किरकोळ आणि दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे. बार्कलेज-हुरुन इंडियाचे हे रँकिंग 20 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित आहे. या मूल्यांकनामध्ये खाजगी गुंतवणूक आणि तरल मालमत्ता समाविष्ट नाहीत.
अंबानींच्या संपत्तीच्या मूल्यामध्ये रिलायन्स, जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल आणि इतर समूह कंपन्यांमधील स्टेक समाविष्ट आहेत. त्यानंतर बजाज फॅमिली 7.13 ट्रिलियनच्या मूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. पुण्यातील ऑटोमोबाईल व्यवसायाचे नेतृत्व कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेते नीरज बजाज करत आहेत.
बिर्ला कुटुंब 5.39 ट्रिलियनच्या मुल्यांकनासह तिसऱ्या स्थानावर आहे. कंपनीचे नेतृत्व कुटुंबातील चौथ्या पिढीतील कुमार मंगलम बिर्ला करत आहेत. ही कंपनी धातू, खाणकाम, सिमेंट आणि वित्तीय सेवांवर लक्ष केंद्रित करते. अंबानी, बजाज आणि बिर्ला या तीन कुटुंबांचे एकत्रित मूल्य हे सिंगापूरच्या जीडीपीच्या बरोबरीचे आहे. जिंदाल कुटुंब 4.71 ट्रिलियनच्या मुल्यांकनासह चौथ्या स्थानावर आहे, ज्याचे नेतृत्व सज्जन जिंदाल करत आहेत. याशिवाय, नाडर कुटुंब ₹ 4.30 ट्रिलियनच्या मुल्यांकनासह पाचव्या स्थानावर आहे. टॉप-10 कौटुंबिक व्यवसायांच्या यादीत नादर कुटुंबातील रोशनी नादर मल्होत्रा ही एकमेव महिला आहे. (हेही वाचा: Reliance Industries Layoff: आर्थिक वर्षे 2024 मध्ये Mukesh Ambani यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 11% कर्मचाऱ्यांना काढून टाकले; तब्बल 42000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या)
तसेच 2024 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली बिझनेस लिस्टमध्ये, पहिल्या पिढीतील व्यावसायिक कुटुंबांचा समावेश नाही. याच कारणामुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव या यादीत नाही. मात्र, विद्यमान चेअरमन गौतम अदानी यांनी स्थापन केलेले अदानी कुटुंब हे पहिल्या पिढीतील सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय म्हणून 15.44 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनासह उदयास आले आहे. या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक असलेले पूनावाला कुटुंब 2.37 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे.