Reliance Industries Layoff: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही भारतातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची कंपन्यांपैकी एक आहे. मुकेश अंबानीद्वारे चालवली जाणारी ही कंपनी तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स, किरकोळ आणि दूरसंचार यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करते. अलीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीजमधील मोठ्या प्रमाणातील टाळेबंदीच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामुळे कंपनी आणि तिच्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगांमध्ये अडचणी वाढत आहेत. या आर्थिक संकटाचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजवरही झाला आहे. तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि पेट्रोकेमिकल्सच्या मागणीत घट, यामुळे कंपनीला खर्चात कपात करावी लागली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 11% म्हणजे 42,000 लोकांची कर्मचारी संख्या कमी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची कर्मचारी संख्या एका वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्ष 2023 मधील 389,000 च्या तुलनेत आर्थिक वर्षे 2024 मध्ये 347,000 पर्यंत घसरली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार नवीन नियुक्तींची संख्या देखील 170,000 पर्यंत कमी झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने मोठी पावले उचलली आहेत. जिओच्या यशाने कंपनीला डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विस्तार करण्यास प्रेरित केले आहे. परंतु या विस्तारामुळे पारंपारिक भागात मागणी कमी असल्याने काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्याच्या कार्याची पुनर्रचना केली आहे. या प्रक्रियेत कंपनीने काही नॉन-क्रिटिकल विभाग बंद केले आहेत किंवा त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. (हेही वाचा: White-Collar Jobs: मंदीचा IT क्षेत्राला मोठा फटका; नोकऱ्यांमध्ये होत आहे घट, व्हाईट कॉलर नोकऱ्यांसाठीच्या रिक्त जागा 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर)
रिलायन्स इंडस्ट्रीजमधील टाळेबंदीच्या बातमीने शेअर बाजारातही खळबळ उडाली आहे. कंपनीसाठी भविष्यात काय आहे आणि ती सध्याच्या स्तरावर स्पर्धात्मकता टिकवून ठेवू शकेल की नाही, याबद्दल गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मात्र, रिलायन्सच्या मजबूत आर्थिक पायाभूत सुविधांमुळे बाजाराने ते स्थिरतेसह स्वीकारले आहे.