Sandes App, WhatsApp, (PC - pixabay)

मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप संदेश (Sandes) तयार करण्यात आले आहे. अहवालानुसार, काही सरकारी अधिकाऱ्यांनी या अॅपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपवर काम करणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर आता हे अॅप तयार झाले आहे. या अॅपच्या चाचण्यानंतर त्याचा वापर सुरू होणार आहे. दरम्यान, GIMS.gov.in या वेबसाइटवर संदेश अ‍ॅपचा लोगो देण्यात आला आहे. या अॅपच्या लोगोमध्ये अशोक चक्र दिसत आहे. या लोगोमध्ये तिरंग्याचे तीन रंग वापरण्यात आले असून मध्यभागी अशोक चक्र देण्यात आलं आहे. यातील दुसऱ्या थर व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेचं दिसत आहे. मात्र, तो गडद हिरवा आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांनी आधीच गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टम (GIMS) वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या काही अहवालात असा दावा करण्यात आला होती की, या अॅपला गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टम (GIMS) म्हटले जाईल. मात्र, आता त्याचे नाव 'संदेश' असे ठेवण्यात आले आहे. (वाचा - Ujjwala Yojana: LPG Gas कनेक्शनसाठी सरकार देत आहे 1600 रुपये; तुम्हीही घेऊ शकता फायदा, जाणून घ्या कुठे व कसे करा अप्लाय)

संदेश या अॅपसंदर्भात Gims.gov.in या संकेत स्थळावर माहिती उपलब्ध आहे. यात साइन-इन LDAP, साइन-इन संदेस ओटीपी आणि संदेस वेब असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. कोणत्याही पर्यायावर टॅप केल्यावर पेजवर एक मेसेज येतो. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ऑथेंटिकेशन मेथड केवळ अधिकृत सरकारी अधिकार्‍यांनाचं लागू आहे.

तुम्ही संदेश अॅपसाठी वेबसाइटवर आपले खाते तयार करू शकत नाही किंवा आपण लॉग इन करू शकत नाही. सध्या हे अॅप केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित आहे. हे सामान्य वापरकर्त्यांसाठी कधी आणले जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

अहवालानुसार, संदेश हे अॅप अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आणल्या जाणार आहे. हे इतर चॅटिंग अ‍ॅप्सप्रमाणे व्हॉईस आणि डेटाला सपोर्ट देते. हे अ‍ॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे व्यवस्थापित केले जाणार आहे.

सध्या, संदेश अ‍ॅपचा वापर विशिष्ट सरकारी अधिकाऱ्यांपुरता मर्यादित आहे. काही कालावधीनंतर हे अॅप सर्वासाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संदेश अॅप व्हॉट्सअ‍ॅपशी कशा पद्धतीने स्पर्धा करेल, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.