Amit Shah (Pic Credit - ANI)

मणिपूरमधील (Manipur) अकरा क्रीडा व्यक्तींच्या गटाने, ज्यामध्ये ऑलिम्पियन्सचा समावेश आहे, गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राज्यातील सध्याचे संकट सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍यांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू यांचाही समावेश आहे. या क्रीडापटूंनी इशारा दिला आहे की, जर राज्यातील परिस्थिती त्वरीत सुधारली नाही आणि ‘शांतता आणि सामान्यता’ पुनर्संचयित झाली नाही, तर ते त्यांचे पुरस्कार आणि पदके परत करतील. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

प्रसिद्ध वेटलिफ्टर कुंजराणी देवी, भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार बेम बेम देवी आणि बॉक्सर एल सरिता देवी यांच्यासह इतर अनेक जणांनी राष्ट्रीय महामार्ग-2 पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग-2 अनेक ठिकाणी अनेक आठवडे ब्लॉक करण्यात आला आहे, परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर महामार्गावरील ब्लॉक हटवा, असे पत्रात नमूद केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर सोमवारी म्हणजेच 29 मे रोजी इंफाळ येथे पोहोचले. यादरम्यान ते मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे आकलन करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, अनेक कॅबिनेट मंत्री, अधिकारी आणि काही निवडक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज, त्यांनी दिवसाची सुरुवात प्रभावशाली महिला नेत्यांच्या समुहासोबत न्याहारी बैठकीने केली, त्यानंतर प्रसिद्ध व्यक्तींसोबत स्वतंत्र बैठक घेतली. मणिपूरच्या चार दिवसांच्या भेटीदरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी हिंसाचाराने उद्ध्वस्त झालेल्या राज्यात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कॅबिनेट मंत्री आणि नागरी समाज संघटनांसह अनेक भागधारकांशी चर्चा केली.

मणिपूरमध्ये 3 मे रोजी व्यापक जातीय हिंसाचार भडकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. याबाबत शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘आज इंफाळमध्ये विविध नागरी संस्था संघटनांच्या सदस्यांशी फलदायी चर्चा झाली. त्यांनी शांततेसाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आणि आश्वासन दिले की, मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे योगदान देऊ.’ (हेही वाचा: हरिद्वारला पोहोचले कुस्तीपटू; ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करणार)

दरम्यान, 3 मे रोजी चकमकी सुरू झाल्यापासून, इम्फाळ खोऱ्यात आजूबाजूला राहणारे मेईटी आणि टेकड्यांमध्ये स्थायिक झालेली कुकी जमात यांच्यात सुरू असलेल्या जातीय हिंसाचारामुळे 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.