काँग्रेसने (Congress) पाच महिन्यापूर्वीच राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा विजय मिळवून देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला. सध्याच्या आकडेवारीनुसार या तीनही राज्यांमधील काँग्रेसची सत्ता भाजप (BJP)ने पूर्णपणे उलथून लावली आहे. संपूर्ण देशातील स्थिती पाहता भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले आहे. सध्याचे आकडे पाहता, एनडीए ला 350 जागा, यूपीए ला 86 तर इतर पक्षांना 101 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप ने 2014 पेक्षा जास्त मुसंडी मारली असून, कॉंग्रेससाठी हा फार मोठा धक्का मानला गेला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष आणि पक्षनेते याची कारणीमिमांसा करतीलच मात्र त्याआधी कॉंग्रेसच्या पराभवाची काही कारणे आम्ही सांगत आहोत.
- अमित शहा यांचे आक्रमक धोरण आणि प्रचार -
राजकीय वर्तुळात हे सर्वजणच जाणतात की, या लोकसभा निवडणुकीवेळी अमित शाह (Amit Shah) यांनी जो आक्रमक प्रचार केला त्याला तोड नव्हती. अगदी भाषणापासून, रॅली, प्रचार, रोड शो यांचे जे त्यांनी धोरण आखले त्यापुढे कॉंग्रेसचे धोरण कुचकामी ठरले. भाजपने प्रचार करण्याचा एकही मार्ग सोडला नव्हता, सोशल मिडीयापासून टीव्ही, जाहिराती अशा सर्व ठिकाणी भाजप नेते आणि मोदीच झळकत होते.
- कॉंग्रेसची नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका –
2014 नंतर अनेक सर्वेक्षणात, पीएम मोदींची लोकप्रियता वेगाने वाढली असल्याचे दिसून आले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर तर पंतप्रधानांची प्रतिमा आणखी सुधारली. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेहमी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलेले लोकांना रुचले नाही. राहुल गांधी यांनी आपल्या प्रत्येक भाषणात कॉंग्रेसने देशासाठी काय केले, यापेक्षा मोदींनी काय केले नाही याचा पाढा वाचला. नरेंद मोदी यांच्यावरील सतत टीका कॉंग्रेसला भोवली.
- नरेंद्र मोदी यांची साफ प्रतिमा -
देशातील जनतेसमोर पंतप्रधान पीएम मोदी यांची प्रतिमा भ्रष्टाचारविरोधी आहे. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आणि भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नाहीत. या उलट कॉंग्रेसवर यूपीए 2 च्या काळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. आजही जनता ही गोष्ट विसरू शकली नाही.
- अतिआत्मविश्वास –
मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचा आत्मविश्वास हा अति झाला. यामुळेच लोकसभा निवडणुकीसाठी जो प्रचार केला गेला त्यामध्ये स्थानिक नेत्यांचे सहभाग फार कमी प्रमामात होता. (हेही वाचा: वायनाड येथील विजयाने राहुल गांधी यांचा नवा रेकॉर्ड; देशाच्या इतिहासात सर्वाधील मतांनी विजयी ठरलेले उमेदवार)
- अंतर्गत भांडणे –
निवडणुकीपूर्वी अगदी जागा वाटपावरून कॉंग्रेसमध्ये अनेक अंतर्गत वाद उफाळले. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत हेवेदावे चव्हाट्यावर आले. उदा: कॉंग्रेसच्या बालेकिल्ला सांगलीची जागा कॉंग्रेसने मित्रपक्षाला देऊ केली यामुळे उद्भवलेला वाद.
- योग्य नेता –
राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू’च्या स्वरुपात जनतेसमोर असताना, कॉंग्रेसने अध्यक्षपद त्यांना देणे जनतेला रुचले नाही. कित्येक लोकांनी कॉंग्रेसचेकडे एक योग्य नेता नाही म्हणून भाजपला मत दिले. भाजपने मात्र नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पंतप्रधान पदाचा एक योग्य उमेदवार देशाला दिला.
- राष्ट्रवाद आणि योजना –
भाजपने पहिल्यापासूनच जातीयवादाचे आणि राष्ट्रवादाचे राजकारण केले. देशात हिंदूंसाठी उठवलेला आवाज, पाकिस्तानविरोधी धोरण अशा गोष्टी भाजपसाठी फायद्याच्या ठरल्या. सोबत भाजपने सामान्य जमातेसाठी अनेक कल्याणकारी योजना सदर केल्या. भलेही या योजना पुढे बारगळल्या असो मात्र भाजपच्या या योजना लोकांना आकर्षित करून घेण्यास कारणीभूत ठरल्या.