सोन्याच्या दरामध्ये आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक वाढ; दिवाळीपर्यंत पार होणार 40 हजाराचा टप्पा, जाणून घ्या आजचे दर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

भारतातील सोन्याच्या किंमती नव्या उच्चांकाकडे जात आहेत. मुंबईत सोन्याचा दर 1263 ने वाढून प्रति ग्रॅमसाठी ₹38,070 इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1,500 डॉलर प्रति औंस च्या वर गेला आहे. मासिक तत्वावर ऑगस्ट 2013 पासूनची सोन्याने गाठलेली ही सर्वात उच्च पातळी आहे. देशातील आघाडीच्या सराफा बाजार अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 38,010 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 38,140 रुपये चालू आहे.

अहमदाबादमध्ये चांदीचा दर प्रति किलो, 43,930 रुपये होता. ज्वेलरी उद्योगपती आणि रत्न व ज्वेलरी ट्रेड कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष शांतीभाई पटेल म्हणाले की, परदेशी बाजारात सोन्याच्या वाढीमुळे देशांतर्गत सराफा बाजारात किंमती वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दारामध्ये होत असलेली ही वाढ नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. (हेही वाचा: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, पुन्हा पार केली पस्तीशी; जाणून घ्या सराफा बाजारातील आजचे दर)

सोन्याच्या भावात काही काळासाठी घट झालीही होती. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव अजून कमी होतील या आशेने दिवाळीत सोने घेण्याचे अनेकांनी ठरवले होते. मात्र आता या नव्या रेकॉर्डसह दिवाळीपर्यंत सोने 42 हजारांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 2000 नंतर पहिल्यांदाच सोन्याचा दारामध्ये इतकी वाढ पाहायला मिळत आहे. 1 ते 6 ऑगस्टपर्यंत सहा दिवसात सोन्याचे भाव प्रति तोळा 1,700 रुपयांनी वाढले आहेत. त्यावर 3 टक्के जीएसटी आकारून सोन्याचा प्रति तोळा दर 38, 200 पर्यंत पोहचत आहे.