गुरदासपूर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 19 जणांचा मृत्यू; पंजाब सरकारने 2 लाख अनुदान केले जाहीर
गुरदासपूरच्या फटाका कारखान्यात स्फोट (Photo Credits: Twitter)

पंजाब (Punjab) मधील गुरदासपूर (Gurdaspur) जिल्ह्यात फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फटाका कारखान्यात स्फोट झाला. गुरदासपूरचे डीसी विपुल उज्ज्वल यांनी सांगितले की, अपघातात आतापर्यंत 19 लोकांचा मृत्यू झाल्याची खात्री केली आहे. जवळजवळ 25 जणांच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या स्फोटाचा जावपास राहणाऱ्या रहिवाश्याना फटका बसला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे अनेक जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी बचाव दल सतत प्रयत्न करत आहे.

दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मृतांच्या नातलगांसाठी 2 लाख आणि गंभीर जखमी झालेल्या सात जणांना ज्यांना अमृतसर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले त्यांना 50,000 रुपये देण्यात येतील. आणि किरकोळ जखमी झालेल्यांसाठी 25 हजार रुपये जाहीर केले. शिवाय सिंग यांनी बटाला येथील फटाका कारखाना स्फोटात दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबरला होणाऱ्या एका लग्नासाठीया  कारखान्यात फटाक्यांची निर्मिती सुरु होती. याचवेळी ही दुर्घटना झाली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीदेखील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासनासह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.