प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

New ATM Cash Withdrawal Rules: 1 जुलैपासून बँकेच्या एटीएममधून (ATM) रोखरक्कम काढून घेण्याचे बरेच बँकिंग नियम बदलणार आहेत. लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान, बँकिंग संबंधित व्यवहारांमध्ये लोकांना देण्यात आलेल्या सुविधा देण्यात आल्या होत्या पण आता 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत. ज्यामुळे 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाने ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कावर एप्रिल, मे, जून असे तीन महिने सूट दिली असून त्याची अंतिम मुदत 30 जून 2020 आहे. यामुळे पूर्वीचे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावरच्या चार्जेसचा समावेश आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँकांच्या एटीएममधूनच पैसे काढणं सोयीचं ठरणार आहे. वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) एटीएममधून रक्कम काढण्यासाठीचे सर्व व्यवहार शुल्क मागे घेतले होते, ज्यामुळे कोरोना संकट काळात लोकांना मोठा दिलासा मिळाला होता.

एटीएम व्यवहाराची फी तीन महिन्यांसाठी कमी करण्यात आली होती. ही सूट केवळ तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती, जी 30 जून 2020 रोजी संपेल. वेगवेगळ्या बँकांमध्ये एटीएमचे नियम वेगवेगळे असतात, त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या होम ब्रांच बँक ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधावा आणि त्यासंबंधीचे नियम जाणून घ्यावे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, बँक आपल्या नियमित बचत खाते धारकांना एका महिन्यात 8 विनामूल्य व्यवहार करण्यास परवानगी देते. यापलीकडे प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते.

या 8 विनामूल्य व्यवहारात 5 एसबीआय एटीएम व इतर कोणत्याही बँकेच्या 3 एटीएममधून विनामूल्य व्यवहार समाविष्ट आहेत. नॉन-मेट्रो शहरांमध्ये 10 विनामूल्य एटीएम व्यवहार मिळतात, ज्यामध्ये एसबीआय आणि इतर बँकांकडून 5-5 व्यवहार केले जाऊ शकतात. त्यानंतर रोखीच्या व्यवहारासाठी 20 + जीएसटी आणि विना-रोकड व्यवहारासाठी 8 + जीएसटी लागतो.