IRCTC ने लागू केला नवीन नियम, ट्रेन चुकल्यावर कोणत्याही शुल्काशिवाय मिळणार सर्व पैसे परत; घ्या जाणून
भारतीय रेलवें (File Photo)

प्रवाशांच्या सोयीनुसार भारतीय रेल्वे (Indian Railways) वेळोवेळी आपले नियम बदलत राहते. यातील काही नियम असे आहेत ज्यांचा लाखो प्रवाशांना थेट फायदा होतो. काही काळापूर्वी रेल्वेने एअरलाईन्स प्रमाणे, एकाच प्रवासादरम्यान एका गाडीनंतर दुसऱ्या गाडीमधून प्रवास करण्याच्या बाबतील संयुक्त पीएनआर देण्याचा निर्णय घेतला. लांब पल्ल्यांचा प्रवास करणऱ्या, तसेच जिथे थेट रेल्वे पोहचत नाही अशा ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे.

तर प्रवाशांच्या पहिल्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे, पुढील ट्रेन पकडण्यास उशीर झाला आणि ती ट्रेन चुकली तर प्रवासी कोणत्याही शुल्काशिवाय पुढच्या प्रवासाचे तिकीट रद्द करू शकतात. रेल्वे बोर्डच्या आदेशात म्हटले आहे की, ‘संयुक्त पीएनआरच्या बाबतीत, जर रेल्वे प्रवाशाची पहिल्या ट्रेनच्या उशीरामुळे पुढील ट्रेन चुकली, तर उर्वरित प्रवासाचे तिकीट रद्द करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.’

परंतु या आदेशामध्ये असेही म्हटले आहे की, प्रवाशाला रिफंडचे पैसे मिळवण्यासाठी पहिल्या ट्रेनच्या प्रत्यक्ष आगमन वेळेच्या तीन तासांमध्ये हे तिकीट रद्द करावे लागेल. लक्षात ठेवा ही सुविधा ई-तिकिटे आणि काउंटरवर घेतलेल्या अशा दोन्ही तिकिटांसाठी लागू असेल. 1 एप्रिलपासून ही सुविधा देशभरात लागू करण्यात आली आहे. (हेही वाचा: सणासुदीच्या काळात ख्रिसमसपर्यंत धावणार 200 जादा गाड्या; पहिल्यांदा उपलब्ध होणार 'या' सुविधा- रेल्वेचा निर्णय)

यामधील उल्लेखनीय बाब म्हणजे, आयआरसीटीसी (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सेवा शुल्कातही (Service Charges) बदल करण्याची योजना आखत आहे. मात्र याचा फायदा केवळ लोकप्रिय युनिफाइड पेमेंट्स सर्व्हिस (UPI) किंवा भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) अॅपद्वारे तिकीट बुक करणार्‍यांनाच मिळेल. दरम्यान, आयआरसीटीसी हे रेल्वे तिकिट बुकिंगसाठी देशातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. एका अहवालानुसार आयआरसीटीसीमार्फत दररोज 1 लाख 30 हजार तिकिटांचे व्यवहार केले जातात.