How to Get Your Driving License: ड्रायव्हिंग लायसन्सबाबत 1 जुलैपासून मोठा बदल; जाणून घ्या ड्रायव्हिंग टेस्ट न देता कसा मिळवू शकाल वाहन परवाना
Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

जर आपण वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) मिळविण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला त्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) देण्याची गरज भासणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) 1 जुलैपासून वाहन चालविण्याच्या परवान्याच्या नियमात मोठा बदल केला आहे, ज्याद्वारे आपल्याला आरटीओमध्ये (RTO) जाण्याची आणि ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देणे बंधनकारक होते. चला जाणून घेऊया ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागेल.

एमओआरटीएचच्या नियमांनुसार आपण मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेतले असेल तर आपल्याला ड्रायव्हिंग परवान्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची आणि चाचणी देण्याची गरज भासणार नाही. सरकारने नुकतेच राज्यनिहाय ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांना मान्यता देण्यास सुरवात केली आहे, जिथे आपण दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविणे सहजपणे शिकू शकता. परवाना मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच अर्जापासून छपाईपर्यंतची सर्वकाही ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे.

नवीन नियमानुसार, आपल्याला ड्रायव्हिंग सेंटरवर हलक्या मोटार वाहन कोर्ससाठी 4 आठवड्यात 29 तास ड्रायव्हिंग करावी लागेल. यासह, आपल्याला 28 दिवसांत वाहन चालविणे देखील शिकावे लागेल. ड्रायव्हिंग सेंटरने तुम्हाला पास केल्यास तुम्हाला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी वेगळी कोणतीही चाचणी देण्याची गरज नाही.

या व्यतिरिक्त, अवजड मोटर वाहन चालविणे शिकण्याचा कालावधी 6 आठवड्यात 38 तास आहे. त्यात शेअरी आणि व्यावहारिक माहिती समाविष्ट आहे. त्याशिवाय वाहनचालकांना रस्ते संबंधित इतर आवश्यक नियमांसह नैतिक आणि सभ्य वागणुकीविषयी काही मूलभूत बाबीदेखील शिकवल्या जातील. (हेही वाचा: e-Aadhaar Card आता कधीही आणि कुठेही डाऊनलोड करण्याची सोय; UIDAI ने शेअर केली 'ही' डिरेक्ट लिंक)

या प्रशिक्षणादरम्यान, अर्जदारांना रस्त्यावर वाहन चालविताना येणाऱ्या सर्व घटनांविषयी माहिती व प्रशिक्षण दिले जाईल. असा विश्वास आहे की या नव्या नियमांच्या मदतीने कुशल चालकांची कमतरता दूर होण्यासही मदत होईल.