प्रतिकात्मक फोटो (File Photo)

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकांमध्ये भरती सुरु होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेत दुप्पट भरतीची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी बँकेत पुढील तीन महिन्यात सुमारे एक लाख प्रोफेशनल्सची भरती करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाजारातील स्पर्धेचे स्वरुप लक्षात घेऊन सरकारी बँकांनी हे पाऊल उचलले आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक यांसारख्या सरकारी बँका आधुनिक बँकीग वर्गात येण्यासाठी मार्चपर्यंत सुमारे 1 लाख प्रोफेशनल्सची भरती करणार आहेत.

बँक वेल्थ मॅनेजमेंट, अॅनालिटिक्स, स्ट्रॅटजी, डिजिटल, कस्टमर सर्व्हीसेस यांसारख्या स्पेशलाईज्ड कामांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामुळे प्रायव्हेट सेक्टरमधील बँकांना टक्कर देणे सोपे होईल.

रिपोर्टनुसार, पब्लिक सेक्टर बँकेत क्लार्कहून अधिक ऑफिसर्स कार्यरत आहेत. बँकेत फक्त 20% कर्मचारी क्लार्क ग्रेड आहेत. स्टेट बँक ही देशातील एकमेव अशी बँक आहे ज्यात 45% कर्मचारी क्लार्क ग्रेडमध्ये येतात.

बँकींग सेक्टरमधील स्पर्धा पाहता सरकारी बँका देखील आता चीफ एथिक्स ऑफिसर, चीफ मार्केटिंग ऑफिसर, चीफ इनवेस्टमेंट ऑफिसर, हेड अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग कॅपेनर यांसारख्या पदे निर्माण करत आहे. पूर्वी ही पदे केवळ प्रायव्हेट बँकांमध्येच होती. त्याचबरोबर गलेलठ्ठ पगाराची ऑफर देण्यात येणार आहे. वार्षिक 50 लाखापासून पॅकेजस सुरु होतील.