पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चक्रीवादळ 'अम्फान' आल्यानंतर, जवळजवळ आठवडाभरानंतर, निसर्ग चक्रीवादळाने (Nisarga Cyclone) आज (3 जून) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडक दिली. तब्बल 129 वर्षानंतर राजधानी मुंबईवर धडकलेल्या या वादळाचा सध्या तरी धोका टळला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्र आणि गुजरातसाठी संकट म्हणून आलेल्या या चक्रीवादळाचे 'निसर्ग' हे नाव बांगलादेशने सुचविले होते, ज्याचा अर्थ होतो ‘प्रकृती’. आता यापुढील चक्रीवादळाचे नाव ‘गती’ (Gati) हे असणार आहे, हे नाव भारताने दिले आहे. विविध देशांच्या गटाने तयार केलेल्या चक्रीवादळांच्या नावांच्या यादीमध्ये, भारताने सुचविलेले 'गती' हे नाव जोडले गेले आहे.
गाडी या शब्दाचा अर्थ होतो वेग. याआधी बांगलादेशने सुचविलेले 'फणी' नावाचे चक्रीवादळ, 3 मे 2019 रोजी ओडिशावर धडकले होते, ज्यामुळे मोठे नुकसान झाले होते. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्यास 2000 मध्ये सुरुवात झाली आणि 2004 मध्ये एका ठराविक सूत्राला मान्यता देण्यात आली. आता येणाऱ्या 'गती'नंतर पुढील काही चक्रीवादळांची नावे इराणने 'निवार’, मालदीवद्वारे 'बुरेवी', म्यानमारने 'तौकते' आणि ओमानचे 'यास' असे ठेवले आहेत.
वैज्ञानिक समुदाय आणि आपत्ती व्यवस्थापकांना चक्रीवादळे ओळखण्यास, त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यास आणि प्रभावीपणे चेतावणी जारी करण्यास मदत करण्यासाठी, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देण्यात आली आहेत. 2000 साली झालेल्या 27 व्या अधिवेशनात, जागतिक हवामान संस्था आणि आशिया आणि पॅसिफिकसाठी संयुक्त राष्ट्रांचे आर्थिक आणि सामाजिक आयोगाने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावावर सहमती दर्शविली होती.
भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि येमेन हे देश या पॅनेलचा हिस्सा आहेत. आयएमडीच्या मानक प्रक्रियेचे अनुसरण करून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर हिंदी महासागरामध्ये उद्भवणार्या चक्रीवादळांना नावे देणे बंधनकारक केले आहे. क्षेत्रीय विशिष्ट हवामान केंद्रे (आरएसएमसी) आणि ट्रॉपिकल चक्रीवादळ चेतावणी केंद्रे (टीसीडब्ल्यूसी) यांनी जगभरातील चक्रीवादळांना नावे दिली आहेत. भारत हवामान खात्यासह एकूण सहा आरएसएमसी आणि पाच टीसीडब्ल्यूसी आहेत. (हेही वाचा: भारत सरकारकडून व्हिसा, प्रवास निर्बंधामध्ये शिथिलता; परदेशातील व्यावसायिक, आरोग्यसेवा कर्मचारी, तंत्रज्ञ व इतर तज्ञांना देशात प्रवासाची परवानगी)
13 देशांच्या सूचनांच्या आधारे एप्रिल 2020 मध्ये 160 चक्रीवादळांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी केवळ अशी नावे निवडली गेली आहेत जी लिंग, राजकारण, धर्म आणि संस्कृतीशी निगडित नाहीत, जी कोणाच्या भावना दुखावणार नाहीत किंवा आक्रमक नाहीत.