प्रत्येकाचे उत्पन्न वेगवेगळे असले तरी पैसे सगळ्यांकडेच असतात. त्यामुळे पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेष करुन या महागाईच्या काळात तर पैसे वाचवणे हे मोठे आव्हान आहे. पण काही साध्या सोप्या उपायांनी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. पैसे कसे वाचवू? या प्रत्येकालाच पडणाऱ्या प्रश्नासाठी काही खास उपाय...
खर्चाचा रेकॉर्ड ठेवा
पैसे वाचवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या खर्चाचा रेकॉर्ड काढा. म्हणजे महिन्याभरात तुमचा किती खर्च होतो, ते ट्रॅक करा. त्यात प्रत्येक लहान मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवा. त्यामुळे तुम्हाला तुमचे बजेट आखणे सोपे होईल. एका महिन्याचा खर्चाचा रेकॉर्ड काढल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यांचा खर्चाचा आकडा कळेल. त्यामुळे हे काम तुम्हाला एकदाच करावे लागेल. विजेचे बिल कमी करण्यासाठी खास '7' ट्रिक्स !
बजेट बनवा
महिन्याभरात तुमचा किती खर्च होतो याचा अंदाज घ्या आणि त्यानुसार बजेट बनवा. मात्र बजेट बनवल्यानंतर ते वाढणार नाही, याची खबरदारी घ्या.
बचतीचा प्लॅन करा
बजेटनुसार खर्च केल्यानंतर तुमच्या कमाईच्या 10 ते 15% बचत करण्याचा प्रयत्न करा. पण तुमचे खर्च अधिक असतील तर तुम्ही बचत करु शकणार नाही.
बचतीचा उद्देश
बचत नेमकी कशासाठी करत आहात, हे ठरवा. एकदा बचतीचा उद्देश निश्चित झाल्यास बचत करणे सोपे होईल. उदा. घरासाठी बचत, कार किंवा बाईकसाठी बचत. बचत केल्याने तुम्हाला भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्मसाठी बचत करु शकता.
प्राधान्यक्रम ठरवा
तुमच्यासाठी कोणती गोष्ट अधिक महत्त्वाची आहे, ते ठरवा. घर, मुलं, पालक, शिक्षण अशा अनेक गोष्टीतून तुमचा प्राधान्यक्रम ठरवा. त्यानुसार खर्च आणि बचत करा.
योग्य ठिकाणी गुंतवणूक
बचत करण्यासाठी तुम्हाला कोठेतरी पैसे गुंतवावे लागतील. मात्र पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे अतिशय आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला योग्य व्याज आणि नफा मिळेल. त्यामुळे पैसे गुंतवण्यापूर्वी अनेक गोष्टींची खात्री केल्याशिवाय कोणतेही मोठे पाऊल उचलू नका.
ऑटोमेटिक सेव्हींग अकाऊंट बनवा
असे काही सेव्हींग अकाऊंट्स किंवा बचत योजना असतात तिथे तुमच्या सॅलरी अकाऊंटमधून ऑटोमेटिक काही रक्कम कट होते आणि सेव्ह होते. त्यासाठी तुम्हाला महिन्याभराची एक रक्कम ठरवावी लागेल.
बचतीच्या आलेखावर लक्ष ठेवा
बचत करणे सुरु केल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच पैसे गुंतवल्यानंतर त्याचे पुरेसे व्याज किंवा नफा मिळत आहे की नाही, हे तपासणे. ज्या खात्यात बचतीचे पैसे ठेवता ते नियमित तपासा, त्यामुळे बचतीचा आलेख तुमच्या लक्षात येईल.