Axis Bank (PC - Wikimedia Commons)

Axis Bank Service Charges Hikes: अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेने 1 जूनपासून सॅलरी आणि बचत खात्यांवरील सेवा शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने पुढील महिन्यापासून बचत खात्यातील किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे. याशिवाय बँकेने मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या मासिक सेवा शुल्कातही वाढ केली आहे.

बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, "बचत/सॅलरी खात्यासाठी टॅरिफ संरचना 1 जून 2022 / जुलै 1, 2022 पासून सुधारित केली जात आहे." शहरे आणि ग्रामीण भागात मासिक किमान शिल्लक 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ऑटो डेबिट फेल्युअरचे शुल्कही वाढवण्यात आले आहे. याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. (हेही वाचा - RBI Cancelled 5 NBFC License: RBI ची मोठी कारवाई! 5 NBFC चा परवाना रद्द; तुम्हीही 'या' बँकातून कर्ज घेतले आहे का?)

कोणत्या सेवेचे शुल्क किती वाढले? जाणून घ्या

  • अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना आता खात्यातील किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल अधिक सेवा शुल्क भरावे लागेल. मेट्रो आणि शहरी भागांसाठी कमाल मासिक सेवा शुल्क 600 रुपये असेल. निमशहरी भागांसाठी ते 300 रुपये असेल. ग्रामीण भागासाठी ते 250 रुपये असेल.
  • NACH डेबिट फेल्युअर फी 500 रुपये करण्यात आली आहे. पहिल्यांदा 375 रुपये, दुसऱ्यांदा 425 रुपये आणि तिसऱ्यांदा 500 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे ऑटो डेबिट फेल्युअरचे शुल्क 200 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आले आहे.
  • बँकेने चेकबुकची किंमत 2.50 रुपये प्रति पानावरून 4 रुपये प्रति पानापर्यंत वाढवली आहे. हे शुल्क 1 जुलै 2022 पासून लागू होईल.

फिजिकल तपशील आणि डुप्लिकेट पासबुक फी ₹75 वरून ₹100 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा बदल 1 जुलै 2022 पासून सर्व बचत खात्यांवर लागू आहे.