Railway | प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

Big announcement of Indian Railways: रेल्वेने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली असून, त्याअंतर्गत आता सर्व कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता (Night Duty Allowance) मिळणार आहे. रात्री सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना रात्र भत्ता देण्याची घोषणा केल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. ट्रेन चालक, ट्रेन ऑपरेशन कर्मचारी आणि देखभाल कर्मचार्‍यांना विशेषतः रात्रीच्या भत्त्याचा फायदा होईल. सध्या 43600 रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळत नव्हता, जो आता मिळण्यास सुरुवात होणार आहे.

याआधी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता उपलब्ध होता, परंतु, अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने या भत्त्याची मर्यादा निश्चित केली होती. त्याअंतर्गत 43600 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्र भत्ता बंद करण्याचे आदेश दिले होते. मध्यंतरी नाईट ड्युटी भत्ता बंद केल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी याला कडाडून विरोध केला होता. रेल्वेच्या या निर्णयाचा तीन लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना फटका बसला. या घडामोडीत, रेल्वे मंत्रालयाने या समस्येवर लवकर तोडगा काढण्याची विनंती पुन्हा वित्त मंत्रालयाला केली. (वाचा - Indian Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारासाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या काय आहे पात्रता आणि पगार)

नाईट ड्युटी भत्ता पुन्हा मिळणार -

यासाठी रेल्वे मंत्रालयाने बोर्डाच्या वतीने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाला संमतीसाठी पत्र पाठवले होते. सचिव, रेल्वे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले की, खर्च विभागाने 16 डिसेंबर 2021 रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला कार्यालयीन ज्ञापनाची एक प्रत पाठवली आहे. इतकेच नाही तर या मुद्द्यावर डीओपीटीला संदर्भ दिला आहे. सध्या बोर्ड डीओपीटीच्या उत्तराची वाट पाहत आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करता येईल.

याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव मंजूर केल्यास लवकरच सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचा भत्ता मिळू शकेल. खरं तर, नाईट ड्युटी भत्ता फक्त अत्यावश्यक ट्रेन चालवणाऱ्या चालकांना, ती चालवणाऱ्यांना आणि देखभालीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनाच दिला जातो.