Aadhar Card (Photo Credits: PTI)

बँकेत 50 हजारांहून अधिक रक्कमचे व्यवहार करायचे असल्यास पॅन कार्ड नंबरची आवश्यकता असते. तसंच आपले पॅन कार्ड चेक करुनच बँकेकडून असे व्यवहार केले जातात. मात्र आता पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिक रक्कमचे व्यवहार करणे शक्य होणार असल्याची माहिती महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी दिली आहे.

पण पॅन कार्डऐवजी आधार कार्डचा वापर करण्यासाठी बँका अन् इतर संस्थांना यंत्रणा अद्ययावत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे अलिकडेच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डऐवजी आधार कार्डच्या माध्यमातून रिटर्न फाइल करता येणार असल्याचे सांगितले. (नव्या अर्थसंकल्पात NRI's साठी खास सुविधा; आता भारतात येताच मिळणार आधार कार्ड)

सद्य परिस्थितीत 22 कोटी पॅन कार्ड आधार कार्डशी संलग्न केलेले आहेत. तर 120 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहेत. त्यामुळे पॅन कार्ड बनवायचे असल्यास आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड असल्यावर पॅन कार्ड तयार करता येते. त्यामुळे आता बँकेचे व्यवहार करतानाही पॅन कार्डऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र 10 लाखांहून अधिक रक्कमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक असेल.