Rahul Gandhi On India-China Border: मी नेहमीच म्हणत आलो आहे की पंतप्रधान खोटे बोलत आहेत; राहुल गांधी यांचे चीनच्या नकाशावर वक्तव्य
Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

Rahul Gandhi On India-China Border: चीनने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिकृत नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन (Aksai Chin) चा वाटा दाखवल्याने भारतामध्ये नाराजी आहे. या प्रकरणावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मी आधीच सांगितले होते की लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही, असे पंतप्रधान खोटे बोलत आहेत.

राहुल गांधी बुधवारी कर्नाटकला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी वर्षानुवर्षे म्हणत आलो आहे की लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही असं पंतप्रधान सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटं आहे. मी नुकताच लडाखहून परत आलो आहे. चीनने आपली जमीन बळकावली आहे हे तिथल्या प्रत्येकाला माहीत आहे. त्यांनी आपली जमीन घेतली आहे. यावर पंतप्रधानांनी काहीतरी बोलायला हवे. (हेही वाचा - India Hits Hard At China: चीनच्या नवीन नकाशावर भारताचा तीव्र निषेध; MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, अशी पावले केवळ सीमाप्रश्नाचे निराकरण गुंतागुंतीचे करतात)

काय आहे नेमक प्रकरण?

चीनने अलीकडेच त्याच्या मानक नकाशाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. चीनने नकाशा जाहीर करताच वाद निर्माण झाला. वास्तविक, चीनने भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला. यानंतर भारताने सांगितले की, अरुणाचल प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.

चीनने सोमवारी 2023 चा नवा नकाशा जारी केल्याचे वृत्त चिनी वृत्तपत्राने दिले होते. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा प्रदेश देखील दाखवला आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग मानतो.

मात्र, भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, भारताने चीनचा हा नकाशा नाकारला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही तो भारताचा अविभाज्य भाग राहील. त्याचबरोबर चीन तैवानलाही आपल्या भूभागाचा भाग मानतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी चीन व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि दक्षिण चीन समुद्रावरही दावा करतो.