Gujarat Floods: गुजरातमधील वडोदरा (Vadodara) शहरात 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे विश्वामित्री नदी (Vishwamitri River) च्या पाण्याची पातळी वाढली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एकूण 24 मगरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आणि निवासी भागात पोहोचल्या. निवासी भागात मगरी पोहोचल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मगरींची सुटका करून त्यांना परिसरातून बाहेर काढले. या सर्व मगरींना वाचवण्यात यश आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी दिली.
75 जनावरांची सुटका -
वडोदरा रेंज फॉरेस्ट ऑफिसर करण सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वामित्री नदीत सुमारे 440 मगरी राहतात, त्यापैकी अनेक आजवा धरणातून पाणी सोडल्यामुळे आलेल्या पुराच्या वेळी निवासी भागात वाहून जातात. या तीन दिवसांत, 24 मगरींव्यतिरिक्त, आम्ही साप, कोब्रा, सुमारे 40 किलो वजनाचे पाच मोठे कासव आणि एका पोर्क्युपिनसह 75 इतर प्राण्यांची सुटका केली. विश्वामित्री नदीजवळ अनेक निवासी क्षेत्र असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -Crocodile Rescued From Vadodara: नागरी वस्तीत आढळली 15 फूट लांब जीवंत मगर; गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, वडोदरा येथे पूरस्थिती (Watch))
आम्ही वाचवलेली सर्वात छोटी मगर दोन फूट लांब आहे, तर सर्वात मोठी मगर 14 फूट लांब आहे. नदीच्या काठावर वसलेल्या कामनाथ नगर येथून गुरुवारी मगरीला पकडण्यात आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी आम्हाला माहिती दिली. याशिवाय 11 फूट लांबीच्या आणखी दोन मगरींची गुरुवारी ईएमई सर्कल आणि एमएस विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागाजवळील मोकळ्या जागेतून सुटका करण्यात आली, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. (हेही वाचा -Kolhapur: पंचगंगा नदीत मगरींच्या दहशतीत 5 दिवस चिखलात रूतला होता 19 वर्षीय तरूण; पहा कसा वाचवला जीव?)
पहा व्हिडिओ -
करणसिंग राजपूत यांनी पुढे बोलताना सांगितले की, या तीन दिवसांच्या अतिवृष्टीमध्ये मानव-मगर संघर्षाची कोणतीही घटना घडली नाही. मगरी सहसा माणसांवर हल्ला करत नाही. त्या नदीतील मासे आणि प्राण्यांचे अवशेष खाऊन ते जगतात. मगरी कुत्रे, डुक्कर आणि इतर लहान प्राणी देखील मारून खाऊ शकतात. विश्वामित्री नदीची पाणी पातळी बरीच कमी झाली असल्याने सुटका करण्यात आलेली मगरी आणि इतर प्राणी लवकरच त्यामध्ये सोडण्यात येतील, असंही राजपूत यांनी सांगितलं.